निळवंडेच्या पाण्याअडून काहींचा राजकारण करण्याचा प्रयत्न - आमदार अमोल खताळ
◻️ निळवंडेचे कालवेतील पाण्यावरून सुरू झालेल्या रणकंदनावरुन विरोधकांना फटकारले
संगमनेर LIVE | ज्यांच्या हातात आता राजकारणासाठी कोणताही मुद्दे शिल्लक राहिले नाही. तेचं आता आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून हेतूपुरस्सर शेतकऱ्यांत दिशाभूल करणारे वातावरण तयार करून विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. निळवंडे कालवे पाण्याअडून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला.
संगमनेर तालुक्यात निळवंडेचे पाण्यावर वादळ उठले आहे. या मुद्द्यावरती आमदार खताळ यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की, यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील निळवंडे उजव्या आणि डाव्या कालव्याला आवर्तन सोडले होते. त्यावेळी कोणतीही अडचण न येता सर्वाना पाणी मिळाले होते. मात्र, यावेळी सुद्धा दोन्ही कालव्यांना व्यवस्थित पाणी चालू होते. हेड ते टेलपर्यंत पाणी जाण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले होते.
उजव्या कालव्याचे पाणी राहुरी तालुक्यामध्ये अजून पोहोचले नाही. परंतु कालव्यामध्ये एक - दोन पाईप टाकून पुढे नाले बंधारे भरण्याचे काम सुरू होते. मात्र काहींनी शेतकऱ्यांना भडकावून देत त्या कालव्यांमध्ये जास्त पाईप टाकून पाण्यावरच दुर्दैवी राजकारण सुरू केले. असा टोला लगावला.
निळवंडे उजवा आणि डावा कालवा लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालेच पाहिजे ही आपली पहिल्यापासून भूमिका आहे. संगमनेर तालुक्यातील दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रातील गावातील ओढे - नाले, छोटे - मोठे पाझर तलाव भरून देण्याची जबाबदारी माझी आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत.
गरज पडल्यास जलसंपदा मंत्र्याकडे पाठपुरावा करून ४ ते ५ दिवसाचे रोटेशन वाढवून प्रत्येकाला पाणी कसे मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील. ज्या शेतकऱ्यांच्या मतावर मी निवडून आलो आहे त्यांना मी कदापिही वाऱ्यावर सोडणार नाही आणि पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. अशी ग्वाही यावेळी आमदार अमोल खताळ यांनी दिली.