आश्वी सह पंचक्रोशीतील गावांना मान्सूनपुर्ण अवकाळी पावसाने झोडपले
◻️ अर्धा तास चाललेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित
◻️ मान्सूनपुर्ण शेतीच्या मशागतीत अडथळा
संगमनेर LIVE (आश्वी) | शुक्रवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक सह पंचक्रोशीतील गावांना मान्सूनपुर्ण अवकाळी पावसाने तडाखा ठेवून दिला. यावेळी अर्धातास चाललेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. तर, दुसरीकडे मान्सूनपुर्ण सुरू असलेली शेतीच्या मशागतीच्या कामात देखील अडथळा निर्माण झाला.
शुक्रवारी सकाळपासूनचं सुर्य आभाळाच्या मागे लपल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवेत उकाडा वाढला होता. दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धातास जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. तर, अचानक आलेल्या पावसामुळे शेतामध्ये मान्सूनपुर्ण मशागतीच्या कामात अडथळे निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, आंबा आणि डाळिंब या फळपीकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असली तरी, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, काही तासांसाठी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे पावसानंतर हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाडपासून नागरिकांना काही काळासाठी दिलासा मिळाला होता.