आश्वी येथील व्यापाऱ्याला स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून लुटले!
◻️ स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडा टाकणारे तीघे जेरबंद
◻️१० लाख लुटत केली होती मारहाण
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील व्यापाऱ्यांला आरोपी महिलेने १५० ग्रॅम सोने १० लाख रूपये असे स्वस्तात देण्याचे आमीष दाखवून दि. १४ मे २०२५ रोजी कुसडगाव (ता. जामखेड) येथे बोलविले होते. व्यापारी पैसे घेऊन आल्यानंतर महिला आरोपी आणि तिचे ८ ते १० साथीदारांनी व्यापारी यांना मारहाण करून त्यांचेकडील १० लाख रूपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. याबाबत जामखेड पोलीस स्टेशन येथे गुरनं २६६/२०२५ बीएनएस ३१० (२) प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.
या दरोडयाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकानी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ तपास पथक नेमून गुन्ह्याचा तपास करणेबाबत आदेश दिले. त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश लोंढे, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, मनोज लातुरकर, सुनिल मालणकर, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, अरूण मोरे यांचे पथकाला कारवाईबाबत सुचना दिल्या.
दिनांक १५ मे २०२५ रोजी पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील काही आरोपी जवळा (ता.जामखेड) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले.
यावेळी त्याच्याकडं अधिक चौकशी केली असता, त्यांनी बऱ्याच आरोपींची नावे पोलीसांनी सांगितलेली आहेत. त्यामुळे या गुन्हयाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
दरम्यान हि कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
***टिप :- या गुन्ह्यातील बहुतांश आरोपी हे फरार असल्यामुळे बातमीत आरोपींची व इतर नावे टाकलेली नाहीत.