प्रसंगी जलसंपदा मंत्र्यांकडून आवर्तन वाढवून सर्व बंधारे भरून घेणार - आ. अमोल खताळ
◻️ पिंपळे आणि डिग्रस येथे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ
संगमनेर LIVE | तुम्हाला या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने घरी बसवलेले आहे. त्यामुळे जनतेच्या मताचा आदर करा. विनाकारण जर कोणी तालुक्याचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणार असेल तर, आमचे कार्यकर्तेसुद्धा तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कॉग्रेस कार्यकर्त्याना दिला. तसेच तालुक्याला पाणी देण्याचं काम आमचे असल्यामुळे वेळ पडल्यास जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून पाच ते सहा दिवसाचे आवर्तन वाढवून घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील पिंपळे, तीगाव, पळसखेडे, चिंचोली गुरव, मालदाड या गावातील कामाचा पिंपळे येथे तर, डिग्रस, खरशिंदे, रणखांबवाडी, मांडवे बुद्रुक, साकुर, वनकुटे या गावांचा एकत्रित डिग्रस येथे जलसंधारण विभागाच्यावतीने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेतर्गत गाळ काढणे कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अमोल खताळ बोलत होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षात या तालुक्यात पाणी न जिरवता एकमेकाची जिरविण्याचे काम केले गेले. परंतु मला एकमेकाची जिरवायची नाही तर, जमिनीमध्ये पाणी जिरवायचे आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यात कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत आहोत. निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यातून व्यवस्थित आवर्तन चालू आहे.
हेडपासून टेलपर्यंत पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. ज्यांनी तुम्हाला ४० वर्ष पाणी न देण्याचे पाप केले, त्यांनाच तुम्ही घरी बसविले आहे. माझ्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावर तुम्ही सर्वांनी विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही. सर्व लहान मोठे बंधारे व पाझर तलाव भरूण देण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तसेच ग्रामीण भागात होत असलेल्या पाण्याच्या क्रांतीमुळे माजी मंत्र्यांना राजकारण करण्यासाठी कुठलेही मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांना हाताशी धरून चांगल्या कामाला खोडा घालण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. परंतु, या तालुक्यातील मायबाप जनता त्यांचे सुरू असणारे राजकारण हाणून पाडतील, याची मला खात्री असल्याचा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजने अंतर्गत संगमनेर तालुक्यातील डिग्रस, खरशिंदे, रणखांबवाडी, मांडवे बुद्रुक, साकुर, वनकुटे तसेच पळसखेडे, तिगाव, पिंपळे, चिंचोली गुरव, मालदाड या गावामधील पाझर तलावातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. हा गाळ काढल्यानंतर निश्चितच पावसाळ्यामध्ये पाझर तलावात पाणी साचून त्याचा या गावातील शेतकऱ्यांना उपयोग होईल. यासाठी लोकपंचायत यंत्रणेने चांगल्या दर्जाचे काम करावे अशा सूचना देखील आमदार अमोल खताळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान यावेळी जलसंधारणचे उप अभियंता कपिल बिडगर, जिल्हापरिषदेचे उप विभागीय अभियंता हितेंद्र गव्हाळे, उप अभियंता सुरेश मंडलिक आदिंसह लाभधारक गावातील सरपंच, उप सरपंच, पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नवनाथ वावरे यांनी केले.
शासन अडीच एकर पर्यत ३७ हजार ५०० रूपये अनुदान देते. यामध्ये अल्प भु-धारक व दिव्यांग लोकांना गाळ घेऊन जाण्यासाठी डिबीटीच्या माध्यमातुन पैसे देत आहे. यामध्ये सुरवातीला लाभ धारक शेतकऱ्यांना स्वतः ता खर्च कराव लागणार आहे. त्यानंतर डीबीटीच्या मार्फत अनुदान हे लाभार्थीच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. अशी माहिती जलसंधारण विभागाचे इंजिनिअर सुरेश मंडलिक यांनी दिली.