निळवंडे कालव्याच्या पाण्यावरुन स्टंटबाजी करणाऱ्यानी आत्मपरीक्षण करावे
◻️ शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे यांनी विरोधकाना फटकारले
संगमनेर LIVE | निळवंडे उजवा आणि डाव्या कालव्यातून सुरू असलेले पाण्याचे आवर्तनातून गावा - गावांमधील बंधारे पाईपद्वारे भरणे सुरूच आहे. त्यामुळे माजी मंत्र्याचे बंधू इंद्रजीत थोरात हे राजकीय द्वेषातून खाजगी कर्मचारी घेऊन स्टंटबाजी करून जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांची विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रत्येक गावामधील शेतकरी समाधानी असून टेलपर्यत पाणी पोहोचल्यानंतर संगमनेर तालुक्यातील दोन्ही कालव्यालगत असलेल्या गावांना पुन्हा पाणी मिळणार आहे. त्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे असा टोला शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राहणे यांनी म्हटले की, ज्यांनी मागील ४० वर्ष या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले. तसेच आत्तापर्यंत त्यांनी निळवंडेवर अनेक निवडणुका जिंकल्या त्यांना या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने घरी बसवले आहे. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, हे त्यांना सहन होत नाही.
म्हणून या तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधींनी व त्यांचे चुलत बंधू तसेच त्यांच्या कार्यकर्त्याकडे आता राजकारण करण्यासाठी कुठलेच मुद्दे शिल्लक राहिले नाही. म्हणून त्यांनी निळवंडे पाण्याचे राजकारण करण्याची स्टंटबाजी सुरू केली आहे. त्यांच्या या राजकीय स्टंटबाजीला तालुक्यातील जनतेने बळी पडू नये.
टेल पासून हेड पर्यत दोन्ही कालव्यावरील गावातील ओढे - नाले, बंधारे, पाझर तलाव भरून देण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर आहे. ते तुम्हाला अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असा विश्वास राहणे यांनी यामध्ये व्यक्त केला आहे.