निळवंडे कालव्यातून पाईप काढण्यावरून शेतकरी आणि अधिकारी आमनेसामने

संगमनेर Live
0
निळवंडे कालव्यातून पाईप काढण्यावरून शेतकरी आणि अधिकारी आमनेसामने

◻️ संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

◻️ मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - रामभाऊ रहाणे 

◻️ कालव्यातून पाण्याचा अनधिकृत उपसा न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यामध्ये निळवंडेच्या पाण्यावरून रणकंदन पेटले आहे. पोलिसांनी पहिले आम्हाला गोळ्या घाला, मग पाणी कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. निमगाव बुद्रुक येथे शेतकऱ्यांचा मोठा जमाव जमा झाला आहे राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील येथे आल्या आहेत. निळवंडे उजवा कालव्याचे उप विभागीय अभियंता प्रमोद माने यांच्यासह विविध अधिकारीही यावेळी उपस्थित झालेले आहेत.

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाईप काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पोलीस बाळाचा वापर करून धाक निर्माण केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्यामुळे ठिकठिकाणी लाभधारक शेतकरी आणि प्रशासन आमने सामने आले आहे. यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

उन्हाळा तीव्र झाल्यामुळे शेतीसाठी आणि वापरासाठी पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यात चाऱ्यांची कामे पूर्ण झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यात पाईप टाकून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे पाईप फोडून टाकल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्या विरोधात थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यासह पाचशे शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. अखेर जलसंपदा विभागाने लेखी देऊन पाईप फोडणार नसल्याचे सांगितले. 

मात्र, त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात जलसंपदा विभागाने आपला शब्द फिरवला आहे. आज पोलीस बाळासह जलसंपदा विभागाचे अधिकारी निमगाव बुद्रुक येथे दाखल झाले. शेतकऱ्यांचाही मोठा जमाव याठिकाणी जमला. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्षरशा त्रेधातिरपीट उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी कळविले.

शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, राहुरी तालुक्यात कालव्यांचे क्षेत्र १६ किलोमीटर आहे. त्या १६ किलोमीटरसाठी तुम्ही वीस दिवस पाणी देणार आहात तर संगमनेर तालुक्यात तिप्पट म्हणजे ४८ किलोमीटरचे क्षेत्र आहे त्याला तुम्ही साठ दिवस पाणी देणार आहात का? त्यावर अधिकाऱ्यांनी आम्ही वीस दिवस पाणी देऊ असे सांगितले. त्यामुळे जनतेने संताप व्यक्त केला.

निळवंडे धरण आणि कालवे व्हावे यासाठी माजी मंत्री  बाळासाहेब थोरात आणि जनतेने पुढाकार घेतला. स्वतःच्या जमिनी दिल्या, नागरिकांचे पुनर्वसन करून घेण्यात हातभार लावला. त्या पाण्यावर नैसर्गिकरित्या पहिला हक्क असताना, आमच्या सोबतच हा अन्याय तुम्ही नेमका कोणाच्या सांगण्यावरून करत आहात? असाही परखड सवाल जनतेने यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला.

तालुक्याच्या उजवा कालवा लाभक्षेत्रावरील विविध गावांमध्ये यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत, पोलिसांनी देखील ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमुक मागविल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी निमगाव बुद्रुक येथील शेकडो शेतकऱ्यांसह कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात उपस्थित होते.

आम्हाला गोळ्या घाला मग पाणी घेऊन जा..

आमच्या हक्काचे पाणी वाहून चालले आहे. आम्ही फक्त बघत आहोत. जमिनी आमच्या गेल्या, आम्ही भूमीहीन झालो. ४०० रुपये गुंठ्याने आमच्या जमिनी घेतल्या. हे पाणी आमच्या हक्काचे आहे, प्रशासनाने जबरदस्ती केली तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला गोळ्या घाला, मात्र आम्ही ऐकणार नाही. आमच्या हक्काचे पाणी, हिशेबाने आम्हाला मिळाले पाहिजे. असे मिर्झापूरचे सरपंच शिवाजी वलवे म्हणाले.

..अन्यथा जलसमाधी घेऊ

शासनाने आमचा अंत पाहू नये. पाणी काढणे ही कठीण प्रक्रिया आहे. एका पाईपमध्ये पाणी भरायला चार तास लागतात. त्यात पाणी कमी झाले की पुन्हा पुन्हा भरावे लागते. शेतकऱ्यांना आदबून मारायचे प्रशासनाने ठरवले आहे का? जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकदा फिल्डवर या, एका पाईपात पाणी भरून दाखवा. आमचा हक्क तुम्ही डावालणार असाल, तर आम्ही सर्व शेतकरी इथेच जलसमाधी घेऊ. असा इशारा निमजचे उपसरपंच अरुण गुंजाळ यांनी दिला.

पहिल्यांदा आम्हाला पाणी द्या..

एकतर संगमनेर तालुक्याला न्यायाप्रमाणे साठ दिवस पाणी द्या. अन्यथा पहिल्यांदा आम्हाला पाणी द्या नंतर तुम्हाला खाली जितके दिवस पाणी द्यायचे तितके दिवस द्या, आमचे भांडण राहुरी बरोबर नाही. ते सुद्धा आमचे भाऊच आहे, मात्र एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय आम्ही सहन करणार नाही. असे संगमनेर बाजार समितीचे संचालक सतिश खताळ यांनी म्हटले आहे.

मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही..

ज्यांनी चाळीस वर्ष या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले, त्यांना व त्यांच्या स्वयंघोषित कार्यकर्त्याना निळवंडे पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. निवडणुका जिंकण्यासाठी निळवंडेचा वापर करणाऱ्यांना या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने घरी बसवले. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. हे त्यांना सहन होत नाही.

म्हणून या तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधींनी व त्यांचे चुलत बंधू तसेच त्यांच्या कार्यकर्त्याकडे आता राजकारण करण्यासाठी कुठलेच मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. म्हणून त्यांनी निळवंडे पाण्याचे राजकारण करण्याची स्टंटबाजी सुरू केली आहे, त्यांच्या या राजकीय स्टंटबाजीला या तालुक्यातील जनतेने बळी पडू नये. सर्वाना पाणी देण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार अमोल खताळ यांच्यावर आहे. ते शेतकऱ्यांना आजिबात वाऱ्यावर सोडणार नाहीत. असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे यांनी म्हटले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्यातून अनधिकृत उपसा न करण्याचे आवाहन..

ऊर्ध्व प्रवरा (निळवंडे २) प्रकल्पाच्या उजव्या कालव्यामधून पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत असून, संगमनेर व राहूरी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीकरिता पुरेसे पाणी मिळेल याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालव्यात अनधिकृतपणे पाइप टाकून पाण्याचा उपसा करू नये, असे आवाहन उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी केले आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार, निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यातून २० एप्रिलपासून लाभक्षेत्रात पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचे नियोजन करताना बंधारे, के.टी. विअर व पाझर तलाव भरून प्रत्येक शेतकऱ्याला समान पाणी मिळावे, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे आणि विभागाच्या नियोजनात अडथळा आणू नये, असे आवाहनही हापसे यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !