पद्मभूषण डॉ. विखे पाटलांमुळे सहकाराला प्रतिष्ठा मिळाली - प्रा. एम. पटेल
◻️ आश्वी खुर्द महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची ९३ वी जयंती साजरी
संगमनेर LIVE | पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी रोवलेल्या सहकाराच्या रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्याचे सर्वस्वी श्रेय हे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे आहे. त्यांचे व्यापक विचार, दूरदृष्टी, सर्व विषयाचा असलेला सखोल अभ्यास त्यामुळेचं खऱ्या अर्थाने ते लोकनेते ठरले.
त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त प्राधान्य दिले. त्यांनी स्थापन केलेल्या पाणी परिषदेमुळे आज भारतात नदी जोड प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. त्यांनी विकासाचा प्रवरा पॅटर्न आणून प्रवरेची संपूर्ण भारतात एक वेगळी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार प्रा. एम. एम. पटेल यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची ९३ वी जयंती आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रा. पटेल बोलत होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पोपटराव वाणी, निवृत्ती सांगळे, बापूसाहेब गायकवाड, भाऊसाहेब जऱ्हाड, सौ. अलका गायकवाड, दिनकर गायकवाड, प्राचार्य देविदास दाभाडे, प्राचार्य सयराम शेळके आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य देविदास दाभाडे यांनी प्रास्ताविक केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब भोसले यांनी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान प्रा. गौरी क्षीरसागर व प्रा. अश्विनी आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. सिताराम अनाप यांनी मानले.