‘सामाजिक समते’च्या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी १५ हजार नागरिकाची उपस्थिती

संगमनेर Live
0
‘सामाजिक समते’च्या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी १५ हजार नागरिकाची उपस्थिती

◻️ समतेची मिसळ हे एकतेचे प्रतीक - बाळासाहेब थोरात

◻️ मानवतेचा धर्म अधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रम देशासाठी दिशादर्शक ठरणार



संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला मार्गदर्शक ठरली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या आनंदाने सामाजिक सलोखा व बंधुभाव वाढीसाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सामाजिक समतेच्या मिसळचा शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तब्बल १५ हजार नागरिकांनी आस्वाद घेतला होता. त्यामुळे हा अभिनव उपक्रम देशासाठी दिशादर्शक ठरला आहे.

संगमनेर बस स्थानकासमोर नवीन नगर रोड येथे संगमनेर तालुका युवक काँग्रेस व विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने समतेची मिसळ हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, इंद्रजीत थोरात, गिरीश मालपाणी, आयोजक डॉ जयश्रीताई थोरात, डॉ. संतोष खेडलेकर यांच्यासह काँग्रेस व संगमनेरमधील ६० पेक्षा जास्त समाजांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर म्हणून ओळखले जाते. अनेक विकासाच्या योजना राबवताना बंधूभावाचे व सुरक्षिततेचे वातावरण हे संगमनेरचे वैशिष्ट्य राहिले असून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मानवता धर्म अधिक दृढ व्हावा या उद्देशाने डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व समाजाने एकत्र येऊन समतेची मिसळ हा उपक्रम केला. 

यामध्ये विविध समाज बांधवांनी मटकी, पाव, मसाले, ताक, मिरची, पाणी, शेंगदाणे, कैरी, मिठावडा, मठ्ठा, कांदे, टोमॅटो अशा विविध वस्तू भरभरून दिल्या. शहरातील व तालुक्यातील हजारो नागरिक व महिलांनी मोठ्या आनंदाने एकत्र येऊन या मिसळ पावचा आस्वाद घेतला.

याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, युवक काँग्रेसच्या पुढाकारातून विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे. यामध्ये भेद नाही, एकता आहे. भारतामध्ये सामाजिक विविधता आहे. मात्र मानवतेचा धर्म अधिक मजबूत होण्यासाठी ही एकत्रित मिसळ आहे. वारकरी धर्मामध्ये जसा काला पवित्र प्रसाद म्हणून घेतला जातो तसा हा एकतेचा संदेश देणारा प्रसाद आहे. यामध्ये कोणताही भेद नाही. समतेचा विचार सांगणारे संत ज्ञानेश्वरांपासून, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विविध संत व समाज सुधारक हे महाराष्ट्राचे आहे. समतेचा विचार महाराष्ट्राने देशाला दिला आहे. समतेची मिसळ हा उपक्रम एकतेचे प्रतीक असून संपूर्ण देशाला दिशादर्शक असल्याचे सांगताना या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा कायम परिवार म्हणून राहिला आहे. काही लोक जाणीवपूर्वक जातीभेद वाढवत आहे. हा जातीभेद नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने एकत्र आले पाहिजे. सर्वात पवित्र हा मानव धर्म असून तो जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहन केले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विविध संत व समाजसुधारकांच्या विचारांची व  संस्काराची परंपरा आहे. जातीच्या नावावर होणारे राजकारण अत्यंत चुकीचे असून मानवतेचा धर्म हा सर्वात मोठा असून तो जपण्यासाठी समतेची मिसळ हा उपक्रम सर्वांनी मिळून आयोजित केला आहे. यामध्ये शहरातील व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी पुढाकार घेऊन विविध वस्तू दिल्या आणि त्या एकत्र करून ही समतेची मिसळ बनवली आहे. आपल्याला असेच एकत्र राहायचे आहे. या कार्यक्रमात सर्वांचाच सहभाग असल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

सौ. दुर्गाताई तांबे यांनी ‘सौ शहरी एक संगमनेरी’ ही परंपरा आपल्या विविध उपक्रमांमधून संगमनेर शहर व तालुक्याने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कायम जपली. असे सांगितले.

यावेळी काँग्रेस, युवक काँग्रेस व विविध युवक संघटनांनी सेवाभावीपणे अत्यंत नम्रपणे काम करताना आलेल्या सर्व संगमनेरकरांचे स्वागत करून त्यांना समतेच्या मिसळचा आस्वाद दिला.

तब्बल १५ हजार नागरिकांची उपस्थिती..

महाराष्ट्र दिनानिमित्त नवीन नगर रोडवर सकाळपासूनच नागरिक महिला व युवकांची मोठी उपस्थिती या समतेच्या मिसळसाठी होती. यावेळी आलेल्या प्रत्येकाची आवर्जून चौकशी करत सर्वांशी संवाद साधण्यात आला. डॉ. संतोष खेडलेकर यांनी संगमनेरच्या सामाजिक समतेची परंपरा सर्वाना समजून सांगितली.

शिस्तप्रिय कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक..

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र धर्म वाढवणारा युवक काँग्रेसचा समतेचा मिसळ हा कार्यक्रम सर्वांनी मिळून यशस्वी केला. यामध्ये विविध समाजाच्या युवकांनी नागरिकांनी पुढाकार घेऊन विविध वस्तू एकत्र करून ही मिसळ केली. ३ हजार डझन  पाव व विविध वस्तू असलेल्या या मिसळचा सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे राज्यभर मोठे कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !