जिल्हा नियोजन निधीच्या विनियोगामुळे सामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल
◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत व्यक्त केला विश्वास
◻️ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शिर्डी आणि अहील्यानगर येथे अभ्यासिकेची घोषणा
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीचा विनियोग सामान्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल अशा पद्धतीने नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करा. योजना राबविताना जिल्ह्याच्या मानवी विकास निर्दशांकाबाबतही जिल्हा प्रशसानाने आढावा घेण्याची घ्यावा. घरकुल योजनांसाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी शिर्डी आणि अहील्यानगर येथे अभ्यासिका सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. बैठकीस खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे, सत्यजित तांबे, आमदार मोनिका राजळे, डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रम पाचपुते, आमदार अमोल खताळ, आमदार हेमंत ओगले, प्रधानसचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव प्रविण दराडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, राजुर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनेंतर्गत १ हजार २१ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत ९३२ कोटी ३८ लक्ष म्हणजेच ९९.९४ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठी ७०२ कोटी ८९ लक्ष रुपयांची शासनाने आर्थिक मर्यादा कळविली होती. राज्यस्तरावर झालेल्या बैठकीत केलेले सादरीकरण व लोकप्रतिनिधींनी केलेली वाढीव मागणी विचारात घेता ८२० कोटी रुपयांचा नियतव्यय शासनाने मंजूर केला असल्याचेही पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी सांगितले.
चालू आर्थिक वर्षात विद्यूत विकासासाठी ५० कोटी रुपये, अपारंपरिक ऊर्जा विकासासाठी ४५ कोटी रुपये, लघूपाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे बांधकाम व दुरुस्तीसाठी ३२ कोटी ८२ लाख, रस्ते विकासासाठी १०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदानासाठी २५ कोटी रुपये, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदानासाठी २५ कोटी, नगर विकासासाठी ७६ कोटी रुपये, यात्रास्थळांच्या विकासासाठी १० कोटी रुपये व पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी १९१ कोटी ९२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रोजगार निर्मिती व जिल्ह्याचे सकल उत्पादन वाढीसाठी कृषी, उर्जा विकास व पर्यटन क्षेत्राशी संलग्न प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील तीन वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास कामांवर खर्च करण्यात आलेल्या निधीतून झालेल्या विकासाचा मानव विकास निर्देशांकाचा तुलनात्मक अभ्यास करुन सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्याचा मानव निर्देशांक उंचावण्यासाठी सर्व विभागांनी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्याच्या विविध विकास कामांबाबत मंत्रलयीन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची सूची तयार करुन सादर करावी. जिल्ह्याच्या पालकसचिवांच्या समन्वयातून प्रस्तावांचा पाठपुरावा करुन तो मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या योजनांची एकत्रित माहिती असलेली अद्यावत माहिती सर्वसामान्यांना मिळावी, यासाठी जिल्ह्याची विकास योजनांची पुस्तिका प्रकाशित करण्यात यावी. जिल्ह्यात जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची कामे शीघ्रगतीने पूर्ण करावीत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या उभारणीसाठी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नसेल अशा ठिकाणी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त समितीने गायरान जमीनीची पाहणी करुन ती घरकुलासाठी उपलब्ध करून द्यावी. मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा विक्रेत्यांवर तसेच पनीर निर्मितीमध्ये भेसळ करणाऱ्यांची अन्न व औषध विभागामार्फत तपासणी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधून पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून पाणीटंचाईच्या प्रश्नावर गांर्भीर्याने काम करावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडीसाठी कुकडी आवर्तनातून पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे. ३१ मे पर्यंत चौंडी येथील तलाव पूणपणे भरलेले असतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अहिल्यानगर व शिर्डी येथे जिल्हा नियोजन निधीतून अभ्यासिका सुरु करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीस सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून २२१ पालख्या जातात. या पालखांच्या नियोजनाबबात जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू करावी. यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून, संत निवृतीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात प्रथम होते त्यामुळे या पालखीच्या नियोजनाबबात विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.