बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळेचं महिला सक्षम - आमदार अमोल खताळ
◻️ उमेद अभियानांतर्गत तालुक्यातील १६३ महिला बचत गटांना ८ कोटी २१ लाखांच्या निधीचे वितरण
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील १६३ महिला बचतगटांना उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अंतर्गत ८ कोटी २१ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. या माध्यमातून गावा-गावातील महिलांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक पाठबळ मिळाले असल्यामुळे महिला खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर पंचायत समिती येथे समुदाय संसाधन व्यक्तींची आढावा बैठक आणि खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक आणि निधीचे वाटप करण्यात आले होते.
यावेळी आमदार खताळ म्हणाले की, पूर्वी बँकांकडून बचत गटांना अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते. मात्र, आता तालुक्यातील बचत गट थकबाकीमुक्त झाले. त्यामुळे २० लाख रुपयांपर्यतचे कर्ज विनातारण मिळत आहे. यासाठी सर्व बँक आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले, सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा कार्यालयातर्फे मोफत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. महिलांनी या संधींचा लाभ घ्यावा. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यात महिला बचतहगटांसाठी मोठ्या उद्योगांचे मार्ग मोकळे करण्यात येत असल्यामुळे रोजगार निर्मितीला गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील सर्व बचत गटांना शासकीय निधी, कर्ज व व्यवसायासाठी आवश्यक मदत देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. महिलांनी पुढाकार घ्यावा. अडचणी आल्याच तर मी आणि आमदार खताळ तुमच्यासोबत असल्याची ग्वाही सौ. नीलम खताळ यांनी दिली.
उमेद अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप सुरू आहे. महिलांनी वेळेवर परतफेड केल्याने बँकांचा विश्वास मिळवला आहे. त्यामुळे आता सर्व बँका कर्ज वाटपात पुढाकार घेत असल्याचे गौरवोद्गार प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी काढले.