भाजपचे गुलाब भोसले यांनी स्वखर्चातून बांधून दिले अभंग परिवाराला नवीन घर
◻️ समाजासमोर घालून दिला आदर्श - आमदार अमोल खताळ
◻️ पिंपळगाव देपा येथील अभंग परिवाराचे घर आगीत जळून झाले होते खाक
संगमनेर LIVE | तालुक्याच्या पठार भागातील भाजपचे अध्यक्ष गुलाब भोसले यांनी स्वखर्चातून पिंपळगाव देपा येथील हिराबाई अभंग यांच्या कुटुंबाला नवीन घर बांधून देत खऱ्या अर्थाने दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करून समाजासमोर आदर्श घालून दिला. असे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा येथील अभंग परिवाराचे घर आगीत जळून खाक झाले होते. त्या परिवाराला संगमनेर तालुक्यातील पठार भागाचे नेते आणि भाजपाचे पूर्व मंडळाचे अध्यक्ष गुलाब भोसले आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पिंपळगाव देपाचे उप सरपंच रणजीत ढेरंगे यांनी स्वखर्चातून बांधून दिलेल्या घराचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आमदार खताळ बोलत होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, गुलाब भोसले यांनी त्यांच्या आयुष्यात आत्तापर्यत सार्वजनिक ठिकाणी खूप मदत केली असेल. मात्र एखाद्या गोरगरिबाला व्यक्तिगत मदत करण्याचं गुण त्यांच्यात असल्यामुळे त्यांनी पिंपळगाव देपाच्या अभंग परिवाराला एक चांगली घर बांधून देत वचनपूर्ती केली आहे. दिलेला शब्द ते कधी मोडत नाही त्यामुळे त्यांना भविष्य निश्चित या भागांत उज्वल भविष्य राहील. जर माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याचा मुलगा तालुक्याचा आमदार होऊ शकतो. तर आगामी काळात तुमच्या मधीलच कुणीतरी एखादा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो.
गुलाब भोसले म्हणाले की, साकुर पठार भागात आत्तापर्यंत आपण अनेक चारा छावण्या टाकल्या, सायकली वाटल्या असे अनेक सामाजिक कामे केली आहेत. मात्र पिंपळगाव देपा येथील अभंग परिवाराचे ज्यावेळी घर आगीत जळून खाक झाले, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रु पाहून मलाही खूप वाईट वाटले होते. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परिवाराला स्वखर्चातून घर बांधून देत वचनपूर्ती केल्याचा अनुभव घेत असल्याचे सांगितले. तर अभंग परिवाराच्या डोळ्यांतील सुखाचे अश्रू पाहून मला देखील समाधान मिळाल्याचे म्हटले.
आमचे सर्व जळून खाक झाल्यामुळे आम्हाला राहायला घर नव्हते. काय करावे आणि काय नाही? हे आम्हाला कळत नव्हते. मात्र, देवदूतासारखे गुलाब भोसले हे आमच्या मदतीला धावून आले आणि आमच्या परिवाराला जगण्याची उमेद दिली. हे सांगताना हिराबाई अभंग यांच्या कन्या पुनम गवळी यांना अक्षरशा गहिवरून आले होते.