आश्वी येथील रयतच्या शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली कायम
◻️ आश्वी इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीच्या निकालात मुलींची बाजी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूलच्या शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली असून शाळेचा इयत्ता दहावीचा शेकडा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. त्यामुळे सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आज मंगळवारी (दि. १३) लागलेल्या निकालात विद्यालयातील कु. साक्षी संदिप हिंगे (४७५/५००) हिने ९६.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. प्रांजल सोमनाथ थोरात (४६५/५००) हिने ९३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर, कु. ईश्वरी भिकाजी सांगळे (४५९/५००) हिने ९१.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.
यावर्षी शाळेतील एकूण १०५ विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी १०१ विद्यार्थी हे उत्कृष्ट गुण मिळवून पास झाले आहेत. यामध्ये विशेष प्राविण्य मिळवून ३८ विद्यार्थी, प्रथम श्रेणी मिळवून ३७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मिळवून २३ विद्यार्थी आणि पास श्रेणी मिळवून ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दरम्यान या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, स्थानिक स्कूल कमिटी, इतर सर्व समितीचे सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य देवराम वडीतके, पर्यवेक्षक दिपक चव्हाण आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.