बोगस बियाण्यांमुळे सरकार आणि कृषी विभागाची बदनामी - आमदार अमोल खताळ
◻️ खरीप हंगाम आढावा बैठकीत आमदार अमोल खताळ यांचे कारवाई करण्याचे निर्देश
संगमनेर LIVE | शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणी येणार नाही याची कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच बोगस बियाण्यांमुळे सरकार व कृषी विभागाची बदनामी होत आहे. यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात खरीप पूर्वनियोजन व आढावा बैठक आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तहसीलदार धीरज मांजरे, सहायक वनसंरक्षक संदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, सहायक उपनिबंधक अधिकारी संतोष कोरे, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, आपला देश कृषिप्रधान देश असून शेतकरी हा केंद्रस्थानी आहे. त्यामुळे खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरवठा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. अनेक कृषी सेवा केंद्रचालक शेतकऱ्यांना खतांबरोबर जबरदस्तीने औषधे खरेदी करण्यास सक्ती केली जात असल्याच्या शेतकऱ्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. असे जे कोणी कृषी सेवा केंद्र चालक असे प्रकार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा आमदार खताळ यांनी देताना याबाबत योग्य त्या सूचना कृषि विभागाला दिल्या. तसेच खरिप हंगामापूर्वी शेतकऱ्यानी कुठली पिके घ्यावीत याविषयी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कृषी मिळावे घेऊन मार्गदर्शन करावे असे निर्देश दिले.
तालुका कृषी अधिकारी सौ. रेजा बोडके यांनी खरीप हंगामापूर्वीचा आढावा दिला. यावेळी किरण गोसावी यांनी शेडनेटमधून केळीचे भरघोस असे उत्पादन कसे घेतले याविषयी माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड आणि कृषी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विवेक कासार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान तालुक्यातील घारगाव, साकूर व कोकणगाव या भागांतील मंडळ कृषी अधिकारी आपल्या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या अनेक तक्रारी आपल्या पर्यत आलेल्या आहेत. याबाबत त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत तुमचा मनमानी कारभार अजिबात सहन केला जाणार नाही. अशी तंबी देत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने करावी, अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील असाही इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
मागील वर्षी नांदूर खंदरमाळ परिसरातील शेतकऱ्यांना शासनाची पिक विमा व नैसर्गिक आपत्तीची मदत मिळवताना अनेक अडचणी आल्या होत्या. यंदा अशा अडचणी टाळण्यासाठी शेतकरी ओळख पत्र वेळेत नोंदणी करणे गरजेचे आहे. पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करून पावसाच्या अंदाजानुसार नियोजन केले पाहिजे. तसेच, ई-पिक पाहणी आणि आगामी ई-पंचनामा ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना असून, शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवण्यासाठी डिजिटल फार्मवर येणे आवश्यक आहे. तालुक्यात बहुतेक ठिकाणी चारा पिके घरासमोर घेतल्यामुळे त्यात बिबटे लपून बसतात व त्यामुळे लहान मुले आणि शेतकऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने या पार्श्वभूमीवर वनविभागाने यासंदर्भात जनजागृती करावी. असे आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले.