संगमनेर तालुक्यातील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा!
◻️ दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान - आमदार अमोल खताळ
◻️ वेल्हाळे ग्रामस्थांनी पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांचे मानले आभार
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानाला अखेर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा मान प्राप्त झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यासोबतच स्थानिक नेते आणि ग्रामस्थांचा मोठा वाटा असून, किशोर भांड, पवन गुलवे, ज्ञानेश्वर मधुकर सोनवणे, संतोष जेडगुळे, अरुण जेडगुळे आणि अजय अण्णासाहेब सोनवणे यांनी यासाठी दिलेला पाठिंबा महत्वाचा ठरला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून हा प्रश्न उचलून धरण्यात आला होता. अखेर अहिल्यानगर येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. हरीबाबा देवस्थान हे वेल्हाळे गावाच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे केंद्र आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या परिस्थितीची दखल घेऊन किशोर भांड, पवन गुळवे, संतोष जेडगुळे, अरुण जेडगुळे, विकास भोईटे, ज्ञानेश्वर मधुकर सोनवणे, अजय अण्णासाहेब सोनवणे यांनी स्थानिक पातळीवर जनजागृती करत आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे या सामुहिक प्रयत्नांमुळे शासनाने हरीबाबा देवस्थान तीर्थस्थळाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.
यामुळे आता मंदिर परिसरात भाविकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था आणि रस्ते आदी सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे वेल्हाळे गावात धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल तसेच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. या निर्णयामुळे वेल्हाळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्यासह स्थानिक पुढाऱ्यांचे आभार मानले आहेत.
हरीबाबा देवस्थान ट्रस्टच्या यात्रेनिमित्त वेल्हाळे येथे गेलो असताना मी ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जासाठी शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण करताना समाधान वाटत आहे. हे फक्त माझे नव्हे, वेल्हाळेकर ग्रामस्थ आणि भाविकांचे यश असल्याची प्रतिक्रिया आमदार खताळ यांनी दिली.