शाहीर विठ्ठल उमप आणि कवी अनंत फंदीच्या शहरातील स्मारकाचा मार्ग मोकळा

संगमनेर Live
0
शाहीर विठ्ठल उमप आणि कवी अनंत फंदीच्या शहरातील स्मारकाचा मार्ग मोकळा

◻️ तालुक्यातील तिर्थक्षेत्र व सांस्कृतिक विकास प्रकल्पांना मंजूरी - आमदार खताळ 

संगमनेर LIVE | जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या मतदारसंघाच्या विविध समस्या आणि गरजा अत्यंत ठामपणे मांडल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संगमनेरच्या विकासाठी यामुळे भरीव निधी उपलब्ध होणार आहे.

यामध्ये तालुक्यातील वेल्हाळे येथील श्री हरिबाबा देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी आ. खताळ यांनी केली होती. या मागणीला यश मिळाले असून देवस्थानास 'क' वर्ग दर्जा मंजूर झाला आहे.

त्याचंबरोबर शाहीर विठ्ठल उमप आणि कवी अनंत फंदी यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. या मागणीला मान्यता मिळून लवकरच निधी उपलब्ध होणार आहे.

तसेच श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ च्या पार्श्वभूमीवर मौजे पारेगाव बुद्रुक येथे पालखी मुक्कामी येणार असल्याने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, निवारा व शौचालय यांसारख्या आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले.

अवकाळी पाऊस, चारा आणि पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचा अहवाल तातडीने वरिष्ठांकडे पाठवण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल, अशी आग्रही मागणी आमदार खताळ यांनी बैठकीत केली.

महादेव प्रणाली अंतर्गत पर्जन्यमापन यंत्रणा कार्यरत आहे का? याचा सविस्तर अहवाल मागवण्यास त्यांनी आग्रह धरला. त्याचबरोबर शहर व ग्रामीण भागात गौण खनिज चोरी, मटका, चोऱ्यांची वाढती प्रमाणे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कडक कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी दिल्या.

पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असलेल्या गावांमध्ये टँकरची संख्या वाढवावी आणि पाण्याच्या शुद्धतेची खातरजमा करावी, अशी सूचना त्यांनी केली.

घरकुल लाभार्थ्यांकडे जमीन नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासाठी गायरान जमिनीचा पर्यायी वापर करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

नाशिक-पुणे हायवे प्रकल्पातील भूमिगत जमिनीच्या मोबदल्याच्या फाईल्स अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्या तात्काळ निकाली काढाव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

बंद पडलेली पर्जन्यमापन यंत्रे व विजेच्या धोकादायक तारा दुरुस्त करण्यास महावितरणला तातडीने सूचना देण्यात याव्यात, अशी मागणीही देखील आमदार खताळ यांनी या बैठकीत केली.

“संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी माझा प्रयत्न सतत चालू राहणार आहे. लोकांच्या अडचणी शासनदरबारी पोहोचवून त्याचे तातडीने निराकरण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे,” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

“संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मालदाड येथील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ, जाखुरी येथील लक्ष्मीआई माता आणि सावरगाव घुले येथील खंडोबा ही तीनही देवस्थाने भाविकांची श्रध्दास्थाने आहेत. या पवित्र स्थळांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक ती विकासकामे व्हावीत आणि शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी पुढील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले."
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !