इंद्रजीत थोरात यांच्यावर गुन्हा दाखल ; निळवंडेच्या पाण्याहून वातावरण तापले
◻️ शेतकऱ्यांसाठी लढणे गुन्हा आहे का? - इंद्रजीत थोरात
◻️ शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा ; सहआरोपी करण्याची केली मागणी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचा वाद चिघळला असून, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, “आम्हालाही सहआरोपी करा" अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. जलसंपदा विभागाने कालव्यातील अनधिकृत पाईप काढण्यास सुरुवात केली असता, शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला. इंद्रजीत थोरात यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करत प्रशासनाच्या कारवाईला आव्हान दिले. जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नीमगाव पागा ते खळी, पिंप्री दरम्यान अनधिकृत पाईप काढताना इंद्रजीत थोरात यांनी अटकाव केला. थोरात यांनी, “आमच्या कारखान्याने पाईप टाकले आहेत, ते काढू नका. शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यासाठी गेल्या, त्यांना आधी पाणी द्या," असे सांगितले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२१, २२३ आणि महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ च्या कलम ९३ (१)(ख), ९३(४) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी लढणे गुन्हा आहे का?
“जलसंपदा विभागाने यापूर्वीही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. संगमनेर तालुक्याचे ४८ किमी लाभक्षेत्र असताना पाण्याबाबत अपेक्षित हमी दिली जात नाही. दिलेला शब्द पाळला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणे गुन्हा आहे का? आम्ही यापुढेही शेतकऱ्यांसाठी लढत राहू,” असे इंद्रजीत थोरात म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांचा उद्रेक.. चोर सोडून सन्याशाला फाशी
गुन्हा दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. “प्रशासन नियोजन देत नाही, हक्काचे पाणी उपसू देत नाही आणि वरून खोटे गुन्हे दाखल करते. हा अन्याय आहे. इंद्रजीत थोरात यांच्यासोबत आम्हालाही सहआरोपी करा” अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करत आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे रामेश्वर पानसरे यांनी सांगितले.
तोडगा निघाला होता, मग गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून?
"काल सायंकाळी प्रशासन, इंद्रजीत थोरात थोरात आणि शेतकऱ्यांमध्ये सामोपचाराने तोडगा निघाला होता. प्रशासनानेही तो मान्य केला होता. मग आता गुन्हा दाखल का झाला? हे संगमनेरला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्यावरही करा!" असे अण्णा राहिंज आणि अरुण राहिंज यांनी म्हटले.