अगस्ती ऋषीं देवस्थान वारकऱ्यांच्या दिंडीची मोफत आरोग्य तपासणी
◻️ निमगावजाळी प्राथमिक केंद्राकडून २६९ वारकऱ्यांची सेवा
संगमनेर LIVE (आश्वी) | अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र अगस्ती ऋषीं देवस्थान येथील वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारी करीता निघाली असता संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथे मुक्कामी थांबली होती. यावेळी प्राथमिक आरोग्य केद्रांचे प्रमुख डॉ. तय्यब तांबोळी, डॉ. देविदास चोखर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आलेल्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करत औषधांचे वाटप केले.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने निमगावजाळी येथील प्राथमिक आयोग्य केंद्रामार्फत २६९ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी डॉक्टरांनी आपुलकीने वारकऱ्यांची चौकशी करत रक्तदाब, मधुमेह, ताप, पाठदुखी, सर्दी, खोकला यासह विविध आजाराच्या तपासण्या केल्या. तसेच दुखापत तथा जखम झालेल्या वारकऱ्यांची मलमपट्टी देखील केली. यावेळी डॉ. तय्यब तांबोळी, डॉ. देविदास चोखर यांच्या हस्ते वारकऱ्याना मोफत आरोग्य किट व औषधांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान याप्रसंगी आरोग्य केंद्राचे सीएचओ सचिन गवारे, अविनाश तांबे, आरोग्य सेवक दीपक महाजन, प्रमोद साठे, वैभव सोनवणे, महेश पतंगे, आरोग्य सेविका शीतल निखाडे, आशा गटप्रवर्तक कल्पना डेंगळे व आशा कर्मचारी उपस्थित होते. तर, सुंदर वैद्यकीय सेवेबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण केले.