◻️ सह्याद्री विद्यालय व एकविरा फाउंडेशन आणि जयहिंद लोकचळवळ वतीने योग शिबिराचे आयोजन
संगमनेर LIVE | धावपळीच्या जीवनात चांगल्या आरोग्यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा असून एकवीरा फाउंडेशन व सह्याद्री विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज तसेच जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली.
डॉ. थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य व सबलीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असून या निमित्ताने शनिवारी रोजी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत भव्य योग शिबिराचे आयोजन केले आहे.
यामध्ये माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे सहभागी होणार आहेत. याचबरोबर सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील सुमारे दोन हजार विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याचबरोबर संगमनेर शहर व तालुक्यातील महिला युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
आरोग्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक जण धावपळी मध्ये व्यस्त असतो आणि तो आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे असून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. योगातून काम करण्यासाठी प्रत्येकाला ऊर्जा आणि उत्साह मिळत असते. कुटुंबातील इतरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महिलांकरता या योग शिबिरातून नक्कीच उत्साह आणि ऊर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान शनिवारी या योग दिनाच्या शिबिरात शहर व तालुक्यातील सर्व युवक कार्यकर्ते पदाधिकारी महिला व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन एकविरा फाउंडेशन, सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.