राहुरीचे गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या ताब्यात!
◻️ तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु
संगमनेर LIVE | तक्रारदार असलेल्या सेवानिवृत्त ग्रासेवकाकडे अहवाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय - ५७) यांना १० हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती.
त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वरील दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता. तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता गटविकास अधिकारी मुंढे यांनी १० हजार रुपये लाचेची स्वतः मागणी करून स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली. तर, याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दरम्यान ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे - वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक म्हणून श्रीमती छाया देवरे आणि परिवेक्षण अधिकारी अजित त्रिपुटे पोलीस उपाधीक्षक, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, चालक अरुण शेख यांच्या पथकाने केली आहे.