अध्यात्माच्या माध्यमातून होणारे कार्य मनाला स्पर्श करणारे - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर येथे ओम शांती केंद्राच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान
संगमनेर LIVE | ओम शांती केंद्राच्या माध्यमातून योग, ध्यानधारणा आणि अध्यात्माच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य मनाला स्पर्श करणारे आहे. येथील वातावरणात खऱ्या अर्थाने सकारात्मक ऊर्जा जाणवली, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर शहरातील गणेश नगर येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या केंद्राच्या वतीने दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान आ. अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी खताळ बोलत होते. ओम शांती केंद्राच्या प्रमुख भारती दीदी, पद्मा दीदी, डॉ. योगिनी दीदी, विकास पुंड, संगीता पुंड, गलांडे आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, मुलांचं प्रेम, त्यांच्या नजरेतील निरागसता अन् ओम शांतीच्या कार्यातली खरी श्रद्धा पाहून मनाला खूप समाधान वाटलं आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात आत्मशांतीची जागृती व्हावी हा या केंद्राचा उद्देश नक्कीच सर्वांनाच प्रेरणा दायक आहे. यापूर्वी आपली पत्नी सौ. नीलम कार्यक्रमाला आली होती आणि आज मला इथे यायची संधी मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. असे देखील यावेळी ते म्हणाले.
माझ्यावर लाडक्या बहिणींनी खूप प्रेम केले आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने या तालुक्याचा लोकप्रतिनिधी झालो. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याकडे आयोजित होणारा कार्यक्रम ऐतिहासिक असेल, अशी मला खात्री आहे. मला तुमचा एक बंधू, एक मुलगा म्हणून स्वीकारा. तुमच्या सुख-दुःखामध्ये सहभागी होण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असे ही आमदार खताळ यावेळी म्हणाले आहेत.