पानोडी शिवारातील शेताच्या बांधावरून चंदनाचे झाड चोरीला
◻️ चंदन चोरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील पानोडी - हजारवाडी येथील रस्त्यालगत असलेल्या शेताच्या बांधावरील रामदास बापू बर्डे यांचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी तोडून पोबारा केला. यावेळी परिसरात पुन्हा चंदनचोर सक्रिय झाल्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पानोडी - हजारवाडी रस्त्यालगत रामदास बर्डे यांच्या स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीतून शुक्रवारी (दि. २०) रात्री चंदनाच्या झाडाचा खालचा भाग चोरट्यांनी कापून नेला. यावेळी झाडाचा वरील भाग चोरट्यांनी तसाच ठेवला आहे. तसेच दुसऱ्या बांधावरील झाड्याच्या बुंध्याला देखील ओळखण दिसून आले आहे.
दरम्यान हे झाड चोरट्यांनी चोरुन नेले नसले तरी, झाड चोरी जाण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे या चंदन चोरांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी रामदास बर्डे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.