प्रवरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे - डॉ. जयश्री थोरात
◻️ गरज पडल्यास तात्काळ यशोधन कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून १० हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आले असून आगामी काळात पावसाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. असे आवाहन डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातून नदीकाठच्या नागरिकांना मदतीसाठी सूचना देण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस होत आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे.
शासकीय स्तरावरून निळवंडे धरणातून १० हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून आगामी काळामध्ये हा विसर्ग वाढू शकतो. याचबरोबर आढळा आणि भोजापुर धरण सुद्धा भरले आहे. त्यामुळे या नद्यांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
ही सर्व परिस्थिती पाहता संगमनेर शहरातील नदीकाठचे नागरिक तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी अधिक सतर्क रहावे. या नागरिकांच्या मदतीकरता काँग्रेस कार्यकर्त्यानी उपलब्ध राहावे, अशा सूचना दिल्या.
दरम्यान मदत लागल्यास तातडीने यशोधन कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन देखील डॉ. जयश्री थोरात यांनी केले.