महाराष्ट्रधर्म हा माणुसकीची शिकवण देणारा - डॉ. जयश्रीताई थोरात
◻️ वडगाव पान येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
संगमनेर LIVE | देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोर समाज सुधारक आणि संताची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. समतेची आणि मानवतेची शिकवण देणारा महाराष्ट्र धर्म हाच देशाला खऱ्या अर्थाने दिशादर्शक असल्याचे मत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मांडले.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्य तिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात भाविकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. थोरात म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र हा मानवता धर्म सांगणारा आहे. महाराष्ट्र धर्मामध्ये अठरापगड जाती सर्व धर्म यांचा समावेश होतो. राकट आणि कणखर असलेल्या महाराष्ट्र हा सांस्कृतिक समृद्धता लाभलेला प्रदेश आहे.
संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई, संत शिरोमणी सावता महाराज यांची परंपरा घेऊन वारकरी संप्रदायाने समतेचा आणि मानवतेचा विचार दिला. आषाढी वारीमध्ये लाखो भाविक एकत्र येतात लहान मोठा भेद विसरून माऊली होऊन एकत्र चालतात. महिला भगिनी ह्या घरात सर्वांसाठी काम करतात मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः करता वेळ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
हभप रामराव महाराज ढोक म्हणाले की, थोरात परिवाराला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चांगल्या कामातून महाराष्ट्रात संगमनेरचा आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा लौकिक निर्माण केला. जनतेची सेवा हीच खरी परमेश्वर सेवा असल्याने बाळासाहेब थोरात हे जनतेच्या हृदयात जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाला मदत करत असल्यामुळे ते खरे वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत.
दरम्यान यावेळी हभप रामराव महाराज ढोक यांच्या अमृततुल्य वाणीतून सुश्राव्य कीर्तन झाले. या कीर्तनासाठी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.