किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद अभिमानाची घटना - ना. विखे पाटील
◻️ छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून केले घोषित
संगमनेर LIVE (लोणी) | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या बारा किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होण्याची ऐतिहासिक घटना संपूर्ण देशाला आणि शिवप्रेमीना अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या राज्यातील गड किल्ले ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खरी साक्ष आहे. जाज्वल्य असा शिवकालीन वारसा या किल्ल्याच्या रुपाने आपल्याला लाभणे हे शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे.
आपल्या राज्यातील शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्वेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदूर्ग, विजयदूर्ग, सिंधूदूर्ग, जिंजी हे गड युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या इतिहासाचा गौरव असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
विश्वनेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून युनेस्को मध्ये वीस देशांनी या किल्ल्याच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी म्हणून मतदान केले, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची घटना असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील गड किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने विशेष योजना तयार करून किल्याचे पावित्र्य राखण्यासाठी काम सुरू केले आहे.
गड किल्ले ही आपली संस्कृती परंपरा जतन करण्यासाठी शासन स्तरावरून सर्व उपाय योजना केल्या जात असताना आता जागतिक वारसा स्थळांमध्ये या किल्ल्याची नोंद झाल्याने किल्याच्या संरक्षणासाठी आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.