पर्यावरण दिनानिमित्त माकपचे राज्यभर वृक्षारोपण अभियान

संगमनेर Live
0
पर्यावरण दिनानिमित्त माकपचे राज्यभर वृक्षारोपण अभियान

◻️ जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू झालेली मोहीम ९ ऑगस्ट, आदिवासी दिनापर्यत महाराष्ट्रभर सुरू राहणार 

संगमनेर LIVE | जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सोमवारी २८ जुलै रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यभर वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या प्रत्येक शाखेच्या वतीने जनतेला बरोबर घेत पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जनसामान्यांमध्ये रुजवत वृक्ष लागवड करण्यात आली. 

जागतिक तापमान वाढीमुळे निसर्गाचे चक्र बदलू लागले आहे. एकाच दिवशी एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे जगभर अनेक ठिकाणी विध्वंस होत आहे. तपमान वाढीमुळे पिके व अन्न, धान्य निर्मितीवरही विपरीत परिणाम झाला आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळून नद्यांना पूर येत आहेत. विविध प्रकारच्या साथी व आजारही जगभर वाढत आहेत. 

पूर, वादळे, अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, हिम वर्षाव अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींची त्यामुळे वारंवारिता वाढली आहे. जीवसृष्टी समोर यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. या सर्व प्रश्नांची जाणीव करून देत निसर्ग संवर्धनाचे महत्त्व जनतेत रुजवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुढाकार घेऊन महाराष्ट्रभर आज कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 

तथाकथित विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रभर व देशभर सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. शक्तिपीठ महामार्ग, वाढवण बंदर व गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज उत्खनन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली गेली आहेत. राज्यभर  हजारो झाडांचे बळी रोज दिले जात आहेत. विकासाचे हे तथाकथित प्रारूप जीवसृष्टी उध्वस्त करत आहे. कॉर्पोरेट कंपन्या व भांडवलदारांचे नफे वाढावेत यासाठी निसर्गाचा बळी दिला जात आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आरे जंगल परिसरामध्ये अशाच प्रकारे वृक्षतोडीचे प्रयत्न होत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा प्रकारच्या बेधुंद वृक्षतोडीला विरोध करत असून विकासाचे ,निसर्गस्नेही प्रारूप स्वीकारण्याची मागणी करत आहे. 

सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आदिवासी विभागामध्ये ' समृद्ध जंगल समृद्ध जीवन' मोहिमे अंतर्गत आदिवासींच्या उत्पन्नाचे साधन असलेला हिरडा व इतर वनौषधीची रोपे वितरित करण्यात आली. पर्यावरण रक्षणाबरोबरच आदिवासींच्या उत्पन्नात वाढ व्हावी या दृष्टीने झाडांची निवड करण्यात आली. आज जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू होणारी ही मोहीम ९ ऑगस्ट, आदिवासी दिनापर्यंत महाराष्ट्रभर सुरू ठेवण्याचा संकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे, जंगले, प्राणी, पशु, पक्षी, जीवसृष्टी टिकावी समृद्ध व्हावे यासाठी संकल्प करत धोरणे घेण्याची आवश्यकता आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने यासंदर्भात आज राज्यभर जनजागृती करण्यात आल्याची माहिती कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !