सीईटी परीक्षाप्रकरणी दोषीवर कारवाई करा - आमदार अमोल खताळ
◻️ प्रश्न चुकीप्रकरणी विषय तज्ज्ञांना बजावली कारणे दाखवा नोटीस
◻️ मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री जयकुमार रावल यांचे आ. खताळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांला विधानसभेत उत्तर
संगमनेर LIVE | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षा मार्फत २८ हजार ८३७ विद्यार्थ्यासाठी ४ मे २०२५ रोजी एमएचटी - सीईटी ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेमधील तब्बल २१ प्रश्न चुकीचे आले होते. त्यामुळे ही परिक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रश्नाकडे आमदार अमोल खताळ व इतर विधानसभा सदस्यांनी विधानसभेचे लक्ष वेधत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
याला उत्तर देताना शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या प्रकरणी संबंधित विषय तज्ज्ञांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्या आनुषंगाने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याची ग्वाही दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका परिक्षा केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या प्रश्न पत्रिकेतील सुमारे २० ते २५ प्रश्नांमध्ये चारही पर्याय चुकीचे असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी चुकीचे पर्याय निवडले व याबाबत त्यांनी परिक्षा केंद्राकडे तक्रार केली. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब आमदार अमोल खताळ यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याबरोबरच हलगर्जीपणा करणाऱ्यांवर काय कारवाई कारणार? असा प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
याला उत्तर देण्यासाठी उभे राहिलेले शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी - सीईटी २०२५ ही सामाईक प्रवेश परीक्षा पीसीबी आणि पीसीएम ग्रुपकरीता दि. ९ एप्रिल २०२५ ते दि. २७ एप्रिल, २०२५ या कालावधीत २८ सत्रात घेण्यात आली होती. त्यात २८ सत्रांपैकी २७ सत्रांमध्ये ६ लाख ७७ हजार ५६० उमेदवारांची परीक्षा सुरळीत पणे पार पडली. २७ एप्रिल २०२५ रोजीच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी, मराठी आणि उर्दू या भाषेमध्ये घेण्यात आलेल्या पीसीएम ग्रुपच्या परीक्षेदरम्यान २७ हजार ८३७ विद्यार्थी उपस्थित होते.
गणित विषयाशी संबंधित इंग्रजी भाषांतरामधील २१ प्रश्नांमध्ये चूका असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मराठी व उर्दू प्रश्नांमध्ये कोणतीही त्रुटी अथवा चूक नव्हती. इंग्रजी भाषांतरामध्ये त्रुटी / चुका आढळल्याने ज्या विद्यार्थ्यानी २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा दिलेली होती, अशा सर्व विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुन्हा ५ मे २०२५ रोजी फेर परीक्षा घेण्यात आली. ही फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
भारतातून अमेरिकेला निर्यात केलेला ४ कोटी २८ लाख रुपये किमतीचा आंबा कागदपत्रातील त्रुटीमुळे अमेरिकेतील व्यापाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे तो आंबा पुन्हा आणणे शक्य नव्हते त्यामुळे तो अमेरिकेतच नाहीसा करावा लागला. यातून या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रश्नाकडे विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी लक्ष वेधले. त्यावर राज्याचे विपणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची चौकशी करून नुकसान भरपाईच्या रकमेबाबतची खातारजमा करण्यात येत असल्याची माहिती सभागृहात दिली.