दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर येथे दिव्यांगाना साहित्य व दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप
संगमनेर LIVE | संगमनेर दिव्यांग भवन व्हावे ही अनेक दिवसाची दिव्यांग बांधवांची मागणी होती. त्यानुसार नगर पालिकेने नेहरू गार्डनजवळ दिव्यांग भवनसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर शहरातील गणेश नगर येथील नगरपालिकेचे योग भवनात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात पाय कॅलिपर्स बसविणे तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राज कुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी संदीप कचेरीया यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, माझ्या राजकीय प्रवासात संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यातूनच दिव्यांग बांधवांच्या गरजांची खरी ओळख झाली. यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर तालुक्यात वयोश्री' योजनेच्या माध्यमातून लाखो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवां पर्यंत पोहोचलो.
पालकमंत्री विखे पाटील हे अहिल्यानगरचे पालकमंत्री असले तरी, त्यांनी संगमनेर तालुक्याचे पालकत्व घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पुढे आणखी गतिमानतेने सुरू राहणार आहे. शासनाच्या अनेक योजना पारदर्शकतेने आपण राबवत आहोत. कुणाला कोणत्याही कामासाठी पैसे देऊ नका. त्यासाठी माझे आणि पालकमंत्र्यांचे कार्यालय, तसेच विळद फाउंडेशन' तुमच्यासाठी नेहमीच खुले आहे, असे सांगितले.
आपण फक्त निवडणुकीचे पुरते राजकारण करत असतो. मात्र, निवडणुका संपल्या की समाजकारण करत असतो. दिव्यांग, वंचित आणि गरजूवंतांना न्याय मिळावा तसेच त्यांना त्यांच्यासाठी शासनाच्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत पोहोचवली जावी, हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. सदैव दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबिरात १२७ दिव्यांग बांधवांनी नोंद केली होती. त्या पैकी ८२ जणांना कॅलिपर्स मंजूर झाले होते. त्यातील १० जणांचे नामंजूर केले. ७२ जणांना तसेच ४१ दिव्यांग बंधू - भगिनींना प्रमाणपत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले