महाराष्ट्रात सुख - समृद्धी आणि बंधुभाव नांदू दे!
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पांडुरंग चरणी प्रार्थना
◻️ महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म - सत्यजीत तांबे
संगमनेर LIVE | पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी वारीला शेकडो वर्षाची परंपरा असून वारकरी संप्रदायाने बंधुभाव आणि मानवतेची शिकवण सर्वाना दिली आहे. ही संस्कृती मानवतेला साद घालणारी असून महाराष्ट्रात सुख समृद्धी, बंधुभाव नांदू दे! राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे! अशी प्रार्थना महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंग चरणी केली.
संगमनेर मधील चैतन्य नगर येथील विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व सौ. कांचनताई थोरात यांच्या हस्ते विठ्ठल व रुक्मिणीची आरती व पूजा करण्यात आली.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, वैष्णव मुर्तडक, नाना देशमुख, सुभाष ताजणे, श्याम अभंग, नितीन अभंग, डॉ. निलेश सातपुते, बाबा मंडलिक, सौरभ कोल्हे, रामनाथ अभंग, गजेंद्र अभंग, मिलिंद औटी, सौ. प्रमिला अभंग, रवींद्र बडे, सुदर्शन पलोड, जीवन पांचारिया, आशिष कोठवळ, प्रशांत अभंग, दत्ता चव्हाण, सतीश बोरकर, राहुल चौधरी, आलोक बर्डे, विशाल ढोले, समीर भोर, मयूर राऊळ आदींसह संगमनेर मधील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, आषाढी एकादशीचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पिढ्यान - पिढ्यांची परंपरा वारीची आहे. वारीमध्ये सर्व मतभेद विसरून एकत्र पायी चालत जातात. महिनाभर महाराष्ट्रात लाखो वारकरी पंढरीची वाट चालत असतात. कळसाचे दर्शन जरी झाले तरी हे सर्व वारकरी आनंद मानतात आणि वर्षभर हा आनंद घेऊन जीवनात उत्साहाने काम करतात. आषाढी एकादशी आणि पायी दिंडी सोहळा वारी ही महाराष्ट्राची आदर्श परंपरा असून मानवतेला साद घालणारी आहे. एक आगळ वेगळं तिचे वैशिष्ट्य आहे.
मागील एक महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झाला असून यावर्षी राज्यात सर्व नागरिकांना सुख समृद्धी लाभू दे. बंधुभाव नांदू दे आणि भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे. हा मानवतेचा धर्म जपण्याचे विचार साधु संत व महात्म्यांनी दिले आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, चोखामेळा अशी थोर परंपरा वारकरी संप्रदायाची असून सामान्य माणसाला विचारांतून ज्ञान देण्याचे काम या संतांनी केले आहे. सर्व धर्म समभावाचा हा विचार पुढे नेण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आनंद सोहळा आहे. लाखो वारकरी देवाच्या दर्शनाला जातात हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. संगमनेर मध्ये मोठ्या उत्साहाने सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. हे भक्तीचे पर्व असून प्रार्थना उपवासाने परमेश्वरा जवळ जाता येते. असे सांगताना टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर हा सुखद क्षण प्रत्येकासाठी असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान तालुक्यातील विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये टाळ मृदंगाच्या गजरात नागरिकांनी आषाढी एकादशी साजरी केली. याच प्रमाणे तालुक्यातील विविध विद्यालयांमधून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाने आषाढी वारीचे दर्शन विद्यार्थ्यानी घडविले.