महायुती सरकारची बदनामी करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करणार
◻️ आमदार अमोल खताळ यांचा विरोधकांना गर्भित इशारा
◻️ घरगुती कामगार महिला लाभार्थ्याना साहित्याचे वाटप
संगमनेर LIVE | महायुती सरकारची सर्वसामान्य घरगुती कामगारांसाठीची योजना मोफत आहे. मात्र तालुक्यात काही दलालाकडून लाभार्थ्याची दिशाभूल सुरू असल्याच्या तक्रारी आपल्यापर्यत आलेल्या आहेत. कोणत्या ही योजनांसाठी पैसे देवू नका. पैसे घेवून लाभार्थीची आणि महायुती सरकारची बदनामी करणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
महायुती सरकारने घरगुती कामगार महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील महिला लाभार्थीना साहीत्याचे वाटप आ. अमोल खताळ यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. याप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, महायुती सरकारने सर्वसामान्य माणूस केंद्रिभूत मानून योजनांचे निर्णय केले. त्याची अंमलबजावणी राज्यात यशस्वीपणे सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून योजना सर्व लाभार्थी पर्यत पोहचत असल्याचे त्यांनी सांगितले. घरेलू कामगार योजनेसाठी नाव नोंदणी करताना मोफत नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन केले होते. परंतू काही दलालांनी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या. त्यांच्या चौकशीची आदेश देण्यात आले आहे.
तालुक्यात महायुती सरकारला बदनाम करण्याचे काम काही मंडळीकडून होत असून, लोकांकडे आता माहीती आणि आधार कार्ड नंबर मागितले जात आहे. कोणालाही व्यक्तिगत माहीती आधारकार्ड नंबर देवू नका असे आवाहन करून कोणत्याही योजनेसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. पालकमंत्री कार्यालय तसेच माझे संपर्क कार्यालय जनतेसाठी सूरू असून तुम्ही स्वतः येवून योजनासाठी नोंदणी करावी. शासकीय कार्यालयात कोणी पैसे मागत असतील तर आमच्याकडे तक्रारी करा. असेही खताळ यांनी सूचित केले.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व एस. आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर व विविध दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप या योजनांतर्गत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे १३ जुलै २०२५ रोजी अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.