नदीकाठच्या गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी - आमदार अमोल खताळ
◻️ निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात १० हजार क्यूसेक्सने पाणी सोडले
◻️ भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू
संगमनेर LIVE | निळवंडे धरणातून सोमवारी दुपारी १० हजार क्यूसेक्सने प्रवरा नदी पात्रा मध्ये पाणी सोडले आहे. त्यामुळे नदी काठच्या सर्व नागरिकांना जलसंपदा विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे.
त्यामुळे संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी काठच्या सांगवी, धांदरफळ, मंगळापुर, खांडगाव, कासारा दुमाला, संगमनेर खुर्द, निंबाळे रायते, वाघापूर, खराडी, पिंपरणे, जोर्वे, रहिमपूर, कनोली व ओझर बंधारा या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच नदीपात्रानजीक जनावरे आणि इतर शेती उपयोगी साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हालवण्यास सांगितले आहे.
दरम्यान प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आंघोळीला किंवा पोहण्यासाठी जाऊ नये. असे देखील आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे.