कांताबाई सातारकर यांच्या नावाने राज्यस्तरीय लोक कलावंत पुरस्कार दिले जाणार
◻️ आमदार अमोल खताळ यांचा शासन दरबारी पुढाकार आणि पाठपुरावा
संगमनेर LIVE | विधायक उपक्रमातून तालुक्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्राला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न सर्वाच्या सहकार्याने आपण करणार आहे. लोक कलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव मोठे करण्यासाठी योगदान देणाऱ्या तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने लोक कलावंताला ‘राज्यस्तरीय पुरस्कारा’ने गौरव व्हावा. यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
आषाढी वारीच्या अध्यात्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदर अमोल खताळ आणि महायुतीच्या पुढाकाराने “बोलावा विठ्ठल"या भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या दिवशी संपन्न झालेल्या या सांस्कृतिक उपक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केंद्र सरकारच्या नारदीय किर्तनाची शिष्यवृती मिळविणारे देशातील पहिले तरूण किर्तनकार गायक पराग पांडव आणि सुरभी कुलकर्णी यांच्या भक्तीगीतांनी यावेळी उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. संगीत संयोजक सत्यजीत सराफ, सिध्दार्थ थत्ते, नरेंद्र साळवे, वैभव पवार, प्रथमेश बिडवे आदीच्या साथ संगतीने भक्तीगीतांची मैफल उपस्थितांची दाद मिळवणारी ठरली.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवाला नवा आयाम प्राप्त करून देण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम सुरू केले असून, याचा पहिला प्रयत्न म्हणून दरवर्षी आषाढी एकादशीला भक्तीगीतांच्या कार्यक्रम करण्याची संकल्पना आहे. त्याची सुरूवात यावर्षी पासून केली असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेरच्या भूमीला साहित्य कला आणि सांस्कृतीचा मोठा वारसा आणि परंपरा आहे. अनेक कलाकारांनी या भूमीचे नाव मोठे केले आहे. कवी अनंत फंदी, शाहीर विठ्ठल उमप यांच्या पासून ते तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर, पवळा भालेराव यांनी कला क्षेत्रात दिलेल्या योगदानाची जाणीव आपल्या सर्वाना आहे. यासर्व ज्येष्ठ आणि लोकमान्य कलावंताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने या सर्व भूमीपुत्रांच्या नावाने दरवर्षी एक राज्यस्तरीय पुरस्कार देण्याची योजना तयार केली असून, यंदाच्या वर्षी पहिला पुरस्कार स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने राज्यातील लोक कलावंतास देण्यात येणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. स्मिता गुणे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
माझ्या कुटुंबाला वारकरी सांप्रदायाचा मोठा वारसा आहे. गेली सव्वीस वर्ष माझी आई न चुकता वारीला जाते. वारीच्या कारणाने माझ्या सारखपुड्याला सुध्दा ती आली नाही. यंदा आई समवेत चार किमी वारीत चालण्याचा आनंद अवर्णनीय आहे. तर, आईने अनेक वर्ष पांडूरंगाची केलेली सेवा फळास आल्यामुळेचं तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. असे आमदार अमोल खताळ यावेळी म्हणाले आहेत.