संगमनेर तालुक्यातील तलाठी २५ हजारांची लाच स्विकारताना चतुर्भुज
◻️ घरकुलाची वाळू वाहतुक सुरू ठेवण्यासाठी मागितली ३० हजाराची लाच
संगमनेर LIVE | पंतप्रधान आवास, रमाई तसेच शबरी अशा शासकीय घरकूल योजनेंतर्गत मंजूर घरकुलाना वाळू वाहतुक सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी लाच मागणारा संगमनेर तालुक्यातील कनोलीचे तलाठी संतोष शेलार याला लाचलुचपत विभागाने २५ हजारांची लाच स्विकारताना सोमवारी (दि. ७ जुलै) पंचासमक्ष ताब्यात घेतले आहे.
याबाबत लाचलुचपत विभागाने कळविलेली माहिती अशी की, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्याना शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू आहे. हे वाळू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाहनाना तहसीलदार यांनी मंजुरी दिलेली आहे. तक्रारदार व त्यांचे मित्र हे त्यांच्या ट्रॅक्टर द्वारे वाळू वाहतूक करण्याचे कामकाज करीत होते.
यावेळी तलाठी संतोष शेलार यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना वाळू वाहतूक करायची असल्यास मला तीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर अवैद्यरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल. असे म्हणून ३० हजार लाचेची मागणी केली. सोमवारी (७ जुलै) तडजोडी अंति २५ हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत.
ही यशस्वी कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अहिल्यानगर लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक छाया देवरे, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक पोलीस हवालदार हरून शेख, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड व सचिन सुद्रुक यांच्या पथकाने केली.
दरम्यान संगमनेर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.