रविवारी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन
◻️ आमदार अमोल खताळ यांचे तालुक्यातील गरजु लाभार्थ्यानी लाभ घेण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने महायुतीच्या वतीने शहर आणि तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत कृत्रिम अवयव शिबीराचे रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात व पाय बसवणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप जागेवरच साहित्य वाटपाचे नियोजन या शिबीराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.
हे शिबीर गणेशनगर येथील नगर पालिकेच्या योगाभवन सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजीत करण्यात आले असून, या शिबीरासाठी येताना दिव्यांग व्यक्तींनी आधार्ड, युडी आयडी कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला सत्यप्रत व छायांकित प्रत सोबत आणणे गरजेचे आहे. तसेच, दिव्यांग व्यक्तींनी सोबत येताना नातेवाईकांना सोबत घेवून यावे असे सांगितले आहे.
यापूर्वी राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून शहर आणि तालुक्यातील वयोवृद्ध नागरीकांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तींनाही व्हावा, यासाठी हे शिबीर संपन्न होत आहे. पात्र दिव्यांग व्यक्तींनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वर्सन केंद्राचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे, प्रकल्प समन्वयक डॉ. दिपक अनाप, डॉ. अभिजीत मिरीकर यांनी केले.