संगमनेर शहरात गटारीची स्वच्छता करताना दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
◻️ आमदार खताळ यांच्याकडून त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
◻️ अस्वस्थ एकावर रुग्णालयात उपचार सुरू ; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय नेते आक्रमक
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटारीचे स्वच्छतेचे काम सुरू असताना विषारी गॅसमुळे अतुल रतन पवार (वय - १९) या नगरपालिकेच्या तरुण स्वच्छता कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारच्यावेळी घडली आहे. तर, त्याच्या मदतीसाठी गेलेल्या रियाज पिंजारी आणि अर्शद शेख हे दोन कर्मचाऱ्याना देखील अस्वस्थ वाटू लागल्याने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेतील दुसरा तरुण रियाज जावेद पिंजारी (वय - २०) यांचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली असून मयताची संख्या आता दोन झाली आहे.
आमदार अमोल खताळ यांचे ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश..
कोल्हेवाडी रोडवरील एसटीपी गटार सफाईचे काम सुरू असताना अतुल रतन पवार हा तरुण दुर्देवाने मयत झाला. संबंधित कामाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. अशा कठीण प्रसंगी आम्ही पवार कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. त्याचबरोबर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा खर्च नगरपालिका प्रशासनाने करावा. अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. मयत अतुल पवार यांच्या कुटुंबियांना शासनाकडून सर्वोतोपरी आर्थिक मदत मिळवून दिली जाईल. या कामाचे मुळ ठेकेदारासह मुश्ताक शेख यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आपण मुख्याधिकारी व पोलिस अधिकारी यांना दिले आहेत. अशी माहिती आमदार अमोल खताळ दिली.
तर, या दुर्दैवी घटनेतील तरुण अतुल पवार हा शहरातील संजय गांधी नगर, वडारवाडी येथे राहण्यास होता. तर, घटनेतील दुसरा तरुण रियाज पिंजारी (वय - २०) यांचा देखील मृत्यू झाला असून मयताची संख्या दोन झाली आहे. मयत रियाज हा शहरातील मदिनानगर परिसरात राहत होता. दोघांच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे. तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. यासाठी मयत तरुणांचे नातेवाईक यांनी पोलिसांची चर्चा केली.
दरम्यान या घटनेनंतर सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यानी देखील आक्रमक होऊन तात्काळ संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.