आश्वी येथील सचिन उपाध्ये पत्रकार सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी
◻️ संघटनेत इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडिया विभागाची जबाबदारी
संगमनेर LIVE (पुणे) | पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली असून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील सचिन विठ्ठल उपाध्ये यांची प्रदेश उपाध्यक्ष (इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया विभाग) म्हणून एकमताने निवड करण्यात आली. संघटनेची पुणे येथे झालेल्या विशेष बैठकीत ही घोषणा करण्यात आली असून उपाध्ये यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. रामनाथ जऱ्हाड, उपाध्यक्ष राजेंद्र बनकर, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष नारायण ढेबे, सरचिटणीस गणेश खेमनर, सचिव अर्जुन आरगडे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन उपाध्ये हे मागील अनेक वर्षापासून डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण व परिणामकारक बातमीदारी करत आहेत. त्यांनी गोरगरीब, आदिवासी व कष्टकरी वर्गाच्या समस्या समाजापर्यंत पोहोचवत अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर उपाध्ये म्हणाले, “ही निवड माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. पत्रकार हा केवळ बातम्या पोहोचवणारा नसून, तो समाज परिवर्तनाचा आधारस्तंभ असतो. आज अनेक पत्रकार आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संघर्ष करत आहेत. त्यांना संघटनात्मक पाठबळ, कायदेशीर संरक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. ‘पत्रकारांचे रक्षण म्हणजे लोकशाहीचे रक्षण’ या तत्त्वावर माझे कार्य आधारित असेल.”
ते पुढे म्हणाले की, “इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार सतत टीआरपीच्या दबावात आणि स्पर्धेच्या झगड्यात काम करत असूनही सत्याशी निष्ठा ठेवतात. सोशल मीडियावरील ग्रामीण स्तरावरील 'ग्राउंड रिपोर्टर्स' अगदी अत्यल्प संसाधनांमध्ये समाजातील सत्य समोर आणतात. त्यांच्या सशक्तीकरणासाठी ओळखपत्र, प्रशिक्षण व कायदेशीर सल्ला यासाठी मी प्रयत्नशील राहीन. तसेच दैनिक पत्रकार हे खऱ्या अर्थाने जमिनीवरचे शिलेदार असून, त्यांच्या आरोग्यविमा, मानधनवाढ व सन्मानासाठी संघटनेतून योजना राबवण्यात येतील.”
संस्थापक अध्यक्ष डॉ. रामनाथ जऱ्हाड म्हणाले, “सचिन उपाध्ये यांच्याकडे असलेले डिजिटल माध्यमातील अनुभव, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाण संघटनेच्या कार्यात नवे चैतन्य निर्माण करतील.”
यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र बनकर, प्रदेशाध्यक्ष नारायण ढेबे, सरचिटणीस गणेश खेमनर आणि सचिव अर्जुन आरगडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. दरम्यान उपाध्ये यांच्यावर चौबाजुनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.