पुणे - नाशिक अंतर फक्त तीन तासांत
◻️ पुणे - अहिल्यानगर - नाशिक या तीन जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्गाचा प्रस्ताव
◻️ संगमनेर तालुक्यातील कासारे, मांची, साकुर आदि नऊ ठिकाणी इंटरचेज होणार
संगमनेर LIVE | पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास विलंब होत असताना, पुणे - नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे - अहिल्यानगर - नाशिक या तीन जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्गाच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव लवकरचं सरकारला पाठवला जाणार आहे. त्यामुळे पुणे - नाशिक दरम्यानचा पाच तासांचा प्रवास तीन तासांवर येणार आहे.
या महामार्गाच्या अंतिम आखणीला सरकारने गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये मान्यता दिली आहे. हा महामार्ग सुरत - चेन्नई महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे इतर राज्यातील वाहनचालकाना देखील यांचा फायदा होणार आहे.
या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), तसेच व्यवहार्यता तपासणी अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्यात आला असून, पुढील काही दिवसांत राज रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) अतिम मान्यतेसाठी सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. असे वृत्त दै. मटा ने दिले आहे.
तीन वर्षात काम होणार पूर्ण..
पुणे - नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाची लांबी १३३ किलोमीटर असल्याने त्याचे काम तीन वर्षात पुर्ण करणे शक्य आहे. त्यासाठी १ हजार ५४५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, शिरुर, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यातून, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून हा महामार्ग प्रस्तावित आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे असून, कृषि, अवजड उद्योग, लघु आणि मध्यम उद्योग, तसेच आयटी कंपन्यांच्या दृष्टीने महत्त्वाची शहरे आहेत. पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात अनेक अडथळे असून, हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित आहे. मात्र, या महामार्गाला चालना मिळाल्यास पुणे - नाशिक दरम्यानचे अंतर तीन तासांपर्यत कमी होणार आहे.
असा असेल औद्योगिक महामार्ग..
पुणे - नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गावर १२ मोठे उडानपूल उभारले जाणार आहेत. नद्या आणि नाल्यांवर हे पूल असतील. पुणे जिल्ह्यातील चिबंळी, चाकण, पाबळ; तसेच अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजुरी, खंडारमाळ, साकूर, मांची, कासारे या नऊ ठिकाणी इंटरचेज असणार आहे. महामार्गावर प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना या इंटरचेजचा उपयोग होणार असल्याने परिसरातील विकासाला गती मिळणार आहे.