सादतपूर शिवारात पती - पत्नीचे संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळले
◻️ आश्वी पोलीसांकडून तपास सुरू; गायकर कुटुंबीय मुळ गोगलगावचे
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रेवजी मुरलीधर गायकर (वय - ६०) आणि नंदा रेवजी गायकर (वय - ५५) या पती आणि पत्नींचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरवार दि. १० जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चेतन गायकर (रा. गोगलगाव, ता. राहाता) यांना फोन आल्यानंतर ते गायकर लवनवस्ती येथे राहत असलेल्या रेवजी गायकर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी चुलते रेवजी गायकर हे घरात मृत अवस्थेत आढळून आले. तर, चुलती घरात न दिसल्याने तिचा शोध घेतला असता घराशेजारील शेततळ्यात चुलती नंदा गायकर यांचा देखील मृतदेह तरंगताना दिसला. त्यामुळे चेतन गायकर यांनी स्थानिकासह पोलीसांना या दुर्दैवी घटनेची माहिती कळवली.
माहिती मिळताच आश्वी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही लोणी येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मयत घोषित केले. यामुळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. डी. पारधी हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान गायकर कुटुंब हे मुळचे गोगलगाव येथील असून रात्री उशीरा गोगलगाव येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर, या दोन्ही पती पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचा तपास आश्वी पोलीस करत असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरणार आहे.