शहरात घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार - पालकमंत्री विखे पाटील
◻️ श्रीरामपूर येथे मंत्री विखे पाटील यांची अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिकांची समन्वय बैठक संपन्न
◻️ महायुतीत येणाऱ्यांचे स्वागत करण्याचे कार्यकर्त्याना केले आवाहन
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | श्रीरामपूर शहराच्या विकासाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. झोपडपट्टीमुक्त शहर करून घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. विकास प्रक्रीयेत श्रीरामपूर आता थांबणार नाही. जनतेच्या मनातील सरकारची विकासाची गती पाहून महायुतीत येणाऱ्यांचे स्वागत करा. असे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नगरपरिषद कार्यालयात मंत्री विखे पाटील यांनी अधिकारी पदाधिकारी आणि नागरिकांची समन्वय बैठक घेवून समस्या जाणून घेतल्या. बैठकीमध्ये नागरीकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत संबधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासन योजनेच्या लाभार्थीना प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले.
बैठकीनंतर संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्हणाले की श्रीरामपूर शहराची राजकीय सामाजिक परीस्थीती आता बदलत आहे. यापुर्वी काय झाले त्याचा विचार न करता विकासाचे राजकारण सुरू झाले आहे.
शेती महामंडळाच्या जमीन घरकुलासाठी उपलब्ध करून दिल्याने घरकुलांचा मोठा प्रकल्प भविष्यात उभा राहाणार आहे. नाॅर्दन ब्रॅन्च कॅनाॅल वरील सर्व अतिक्रमण काढण्यात येणार असल्याने तिथे कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. जलसंपदा विभागाचे अधिकारी पाहाणी करून गेले असल्याने नगरपालीकेने सुध्दा याबाबत कडक धोरण घ्यावे.
जलसंपदा विभाग या कॅनाॅलच्या बांधकामसाठी निधी देणार असल्याने भूमीगत कॅनाॅल करून त्यावर सुशोभीकरणाचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून राज्याचा विकास होत आहे.नगरपालिका कार्यक्षेत्रात विकासासाठी निधी देवून पायाभूत सुविधा भक्कम करण्याला प्राधान्य असून लोकांचे जीवनमान उंचावणे हैच महायुती सरकारचे धोरण आहे.
विकासाची प्रक्रीया पाहून अनेकजण आता महायुतीत येत आहेत त्यांचे स्वागत करायला पाहीजे. असे स्पष्ट करून विकास प्रक्रीयेत जसा महाराष्ट्र आता थांबणार नाही. तसेच श्रीरामपूर सुध्दा मागे राहाणार नसल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरात उभा राहावा म्हणून अनेक वर्षाची प्रतिक्षा आता संपली आहे. सर्वानी त्याचे स्वागत केले पाहीजे. पण महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्याचे आश्चर्य वाटते. अनेक लोक मला भेटले मात्र शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे शहराचे वैभव वाढले आहे याची जाणीव ठेवली पाहीजे. आणखी एखादे स्मारक उभारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा.
दरम्यान बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, नानासाहेब पवार, दिपक पठारे, जितेंद्र छाजेड, बाबासाहेब चिडे, संजय फंड, शरद नवले, गणेश मुदगले, केतन खोरे, रवी पाटील, श्रीमती मंजूश्री ढोकचौळे यांच्यासह प्रांताधिकारी किरण सावंत, तहसिलदार मिलींद वाघ, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.