कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा

संगमनेर Live
0
कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा

◻️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

◻️ शिर्डी विमानतळ आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित 

संगमनेर LIVE (शिर्डी) | आगामी काळात होणाऱ्या नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नुतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

शिर्डी विमानतळाच्या कामाचा आढावा आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, मुख्य वित्त अधिकारी अनिशा गोदानी आदी उपस्थित होते. 

शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरण व नुतनीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिर्डीतील विमानतळावरील नवीन एटीसी इमारत, नवीन एकात्मिक मालवाहतूक इमारत, नवीन टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे आगामी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, ही कामे संथगतीने सुरू आहेत. ही कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक वाटल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे. तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत. 

शिर्डी विमानतळ हे मुंबई व नवी मुंबई विमानतळाच्या जवळचे विमानतळ आहे. येथील लहान विमाने पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. त्यादृष्टीने आतापासूनच शिर्डी विमानतळावर सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्यास आणखी जमिन संपादीत करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 

उपमुख्यमंत्री पवार यांनी पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच त्याठिकाणी मोठी विमाने उतरण्याची सोय असावी, त्यासाठी आतापासूनच आवश्यक ती काळजी घ्यावी. या विमानतळावर विमानांच्या हँगरचीही व्यवस्था असावी, असे सांगितले. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष स्वाती पांड्ये यांनी सादरीकरणाद्वारे शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामांची माहिती दिली. शिर्डी विमानतळासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनी व कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींनीही माहिती दिली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !