डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयतर्फे पशुधनाचे लसीकरण शिबिर संपन्न
संगमनेर LIVE (नगर) | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषि महाविद्यालय, विळद घाट यांच्या वतीने ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत पशुधन लसीकरण शिबिराचे आयोजन कृषिदूतांच्या वतीने दिनांक २१ जुलै २०२५ रोजी, वाटेफळ (ता. व जिल्हा अहिल्यानगर) येथील अमृते मळा येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गावचे सरपंच बाबासाहेब अमृते, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे तसेच गावातील प्रगतीशील पशुपालक रवी अमृते, आसाराम गुंड, कार्तिक साळुंखे, विशाल अमृते, बबन अमृते आदी शेतकरी उपस्थित होते.
पशुवैद्यकीय दवाखाना, रुईछत्तीसी येथील पशुसंवर्धन पर्यवेक्षक अधिकारी डॉ. संतोष साळुंके यांनी जनावरांना लस टोचली व पशुपालकांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, पावसाळ्यात प्रादुर्भाव होणाऱ्या विविध संसर्गजन्य रोगांपासून जनावरांचे संरक्षण होणे अत्यावश्यक आहे. मागील दोन वर्षांपासून लंपी त्वचा रोगाने पशुधनावर मोठा परिणाम झाला आहे. अशा रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरते. यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान टळते तसेच पशुधनाची उत्पादनक्षमता वाढते.
या कार्यक्रमासाठी प्रा. सुनील कल्हापुरे (संचालक - तांत्रिक, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट, अहिल्यानगर), कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत, तसेच पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. दौलतराव नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान या शिबिराचे नियोजन व यशस्वी आयोजन कृषिदूत प्रसाद पाटील, अंगाराम तारडे, सुजित उगले, सौरभ यादव आणि सिद्धांत पवार यांनी केले.