निळवंडेच्या दोन्ही कालव्यातून १५ जुलैपासून ओव्हर फ्लोचे पाणी सुटणार
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पत्रानंतर जलसंपदा मंत्र्याचे प्रशासनाला निर्देश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरण परिसरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने निळवंडे धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी डावा आणि उजवा कालव्यामध्ये सोडून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन १५ जुलै २०२५ पासून दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत.
भंडारदरा आणि निळवंडे धरणात क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांवर संकट येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे निळवंडे धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी निळवंडे कालव्याच्या दोन्ही कालव्यात सोडले तर, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नदी काठच्या गावातील पाणीपुरवठा योजनांना या पाण्याचा फायदा होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे.
त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन निळवंडे धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी तातडीने दोन्ही कालव्यांना सोडण्यात यावे. अशी मागणी आमदार खताळ यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे ७ जुलै २०२५ रोजी पत्राद्वारे केली होती. त्यानतंर १५ जुलैपासून दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.