१ जानेवारी २०२५ पर्यतचे तुकडेबंदी व्यवहार नियमित होणार!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या लक्षवेधी नंतर महसूलमंत्री बावनकुळे यांचे आश्वासन
संगमनेर LIVE | विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी नगर पालिका हद्दीत व हद्दी लगत नागरी वस्तीत लागू असलेला तुकडाबंदी कायदा रद्द करण्याच्या मागणीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. १ जानेवारी २०२५ पर्यत झालेले सर्व व्यवहार नियमित करण्याचे आश्वासन दिल्याने राज्यातील लाखो कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.
राज्यात तुकडाबंदी कायद्यानूसार एक किंवा दोन गुंठ्यांचे व्यवहार केलेल्या नागरीकांना तुकडाबंदी कायद्याच्या बंधनामुळे घेतलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम किंवा त्या जागांचे व्यवहार सुध्दा करता येत नव्हते. या संदर्भात आमदार खताळ यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे शासनाचे लक्ष वेधत तुकाडाबंदी कायद्याची अट रद्द करण्याची मागणी केली. या मागणीला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि नगर पंचायत क्षेत्राच्या हद्दीत व हद्दी लगत ज्या भागात तुकाडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असेल, त्या भागामध्ये १ जानेवारी २०२५ पर्यत झालेल्या व्यवहाराकरीता नियम शिथिल करण्याचे जाहीर केले.
तसेच तुकडाबंदी कायद्याच्या संदर्भात राज्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुद्रांक आयुक्त आणि जमाबंदी आयुक्त आणि नगरविकास सचिव यांची समिती नेमून येत्या पंधरा दिवसात तुकडा बंदी बाबत निश्चित मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याची घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली.
यासंदर्भात आमदार अमोल खताळ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या प्रश्नाबाबत सातत्याने पाठ पुरावा सुरू ठेवला होता. सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करून या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाला महायुती सरकारने दिलासा दिला असल्याची प्रतिक्रीया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.