प्रवरा नदीकाठच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा
◻️ गोकुळ दिघे यांची तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नदीकाठच्या क्षेत्रात पाण्याने शिरकाव केला आहे. हे पाणी शेतात फिरल्यामुळे नदीकाठच्या क्षेत्रातील शेती पिकांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्व नुकसानग्रस्त शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आश्वी मंडळ अध्यक्ष गोकुळ दिघे यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गोकुळ दिघे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या पाण्यामुळे शेतातील भाजीपाला, मका, घास व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने जोर्वे, पिंपरणे, कनोली, कणकापूर, रहिमपूर, ओझर, वाघापूर, खराडी, निंबाळे या गावातील शेतकऱ्यांना मोठ्या अर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेती पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. असे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सचिन दिघे, बाळासाहेब दिघे, अमोल दिघे, पंकज दिघे, संदीप जगणर, कृष्णा इंगळे, हरीश जोर्वेकर, बाबासाहेब थोरात, सचिन इंगळे, किरण काकड, योगेश मोगले, प्रकाश काकड, जोर्वेचे तलाठी संकेत काशीद, संतोष खोले यांसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळ दिघे यांनी नुकसानीची माहिती पालकमंत्री नामदार विखे पाटील यांना कळवली. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी तात्काळ प्रशासनाला नदीकाठच्या गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.