वृक्षारोपण व पुस्तक वितरण मोहिमेने करणार आदिवासी दिन साजरा - माकप
◻️ २८ जुलै रोजी पूर्ण राज्यभर गावोगावी उपक्रम राबवण्याचा माकपचा निर्धार
संगमनेर LIVE | क्रांतिकारकांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीत रुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तालुकाभर पुस्तक विक्री व वितरण आणि पर्यावरण रक्षणासाठी व आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढावे यासाठी हिरडा, सिताफळ, जांभुळ, कौठ या झाडांची रोपे वितरणाची व्यापक मोहीम करून आदिवासी दिन साजरा करण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
दिनांक २८ जुलै हा जगभर जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार २८ जुलै रोजी सबंध राज्यभर गावोगावी वृक्षारोपण करून हा दिवस साजरा केला जाणार आहे.
अकोले तालुक्यामध्ये २८ जुलैपासून तालुकाभर वृक्षारोपणाचे व रोपे वितरणाचे व्यापक अभियान सुरू करण्यात येत असून ते ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिना पर्यंत चालेल. पक्षाच्या कार्यालयात याबाबत जोरदार तयारी सुरू असून अकोले विभागात वाटप करण्यासाठी आवश्यक असलेली रोपे कॉम्रेड सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली उपलब्ध करण्यात आली आहेत.
कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली समशेरपुर पट्ट्यात हे अभियान राबवले जात असून रोपे उपलब्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. कॉम्रेड नामदेव भांगरे यांच्या नेतृत्वाखाली राजूर व शेंडी पट्ट्यामध्ये रोपे वितरणाचा व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर व नगर तालुक्यात अशाच प्रकारे वृक्षारोपणाचे व रोपे वितरणाचे अभियान करण्यात येणार आहे.
९ ऑगस्ट आदिवासी दिनाच्या दिवशी मध्यवर्ती चौकामध्ये क्रांतिकारकांचा इतिहास व विचार सांगणाऱ्या पुस्तकांचा स्टॉल लावण्यात येणार असून या माध्यमातून विचारांचा जागर तरुण पिढीमध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती कॉ. सदाशिव साबळे, कॉ. एकनाथ मेंगाळ, कॉ. नामदेव भांगरे, कॉ. ताराचंद विघे यांनी दिली.