शहीद संदीप घोडेकर यांच्या कुटुंबीयांचे माजी मंत्री थोरात यांनी केले सांत्वन
◻️ अकोले नाका येथे शहीद स्मारक उभारले जाणार
संगमनेर LIVE | संगमनेरचे सुपुत्र आणि वीर जवान संदीप किसन घोडेकर हे देशासाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. त्यामुळे यांचे देशवासीयांना सदैव स्मरण राहील. अशा शब्दांत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
घोडेकर मळा येथे वीर जवान संदीप किसन घोडेकर यांच्या कुटुंबीयांची बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन वीरपत्नी वर्षा घोडेकर, मुलगा यश घोडेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, राजेश वाकचौरे, गजेंद्र अभंग, गणेश मादास, भाऊ गणेश, किसन घोडेकर, भगवान घोडेकर, दिलीप म्हसे, सदाशिव घोडेकर, तुषार घोडेकर, नवनाथ आरगडे, जीवन पांचारिया, अनिल घोडेकर, सुनील घोडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वीर जवान संदीप यांनी शिक्षण घेऊन देशसेवेचे व्रत हाती घेतले. सैनिक सीमेवर रात्रंदिवस पहारा करत असतो. जेव्हा देशवासीय सण, परंपरा साजरी करत असतात तेव्हा हे जवान आपल्या घरापासून दूर असतात. सीआरपीएफ दिल्ली येथे कार्यरत असताना जवान संदीप यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे.
संगमनेरच्या सुपुत्राने देशाकरता दिलेले हे बलिदान असून त्यांचे योगदान हे संगमनेरकरांच्या आणि देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. याचबरोबर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अकोले नाका या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे याकरता नगरपालिकेकडे जागेची मागणी केली आहे. त्याचबरोबर शहीदांचे स्मारक व्हावे, यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.