युवकांनो मोबाईलच्या रील बनण्यापेक्षा रियल बना - प्रा. विठ्ठल कांगणे
◻️ संगमनेर येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन
संगमनेर LIVE | आजच्या तरुण पिढीचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर हे असले पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जागरूक जरूर राहावे. मात्र, त्याच्या आहारी जाऊ नये. दुर्दैवाने आजच्या पिढीचे आदर्श वेगळेच निर्माण होत आहे. तरुणांनी मोबाईलच्या रील बनण्यापेक्षा रियल बनण्याकडे लक्ष द्यावे. असे आवाहन व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले.
छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने अमृता लॉन्स येथे गुरुपौर्णिमानिमित्त आयोजित सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन आहेर, उपाध्यक्ष ऋषिकेश काकड, अजय फटांगरे, महेश सोनवणे, संदीप गुंजाळ, खंडू सातपुते, विजय आहेर, जे. के. सातपुते, लक्ष्मणराव ढोले, डॉ. राजू मस्के, साहिल गुंजाळ, तेजस गोर्डे, ललित शिंदे, ओम जाधव, शैलेश आहेर, राज काकड, चैतन्य देठे, सोहम पलोड, सोहम शिंदे, शुभम थोरात, प्रशांत पांडे, गौरव आहेर, इरफान पठाण, मयूर कांडेकर, सार्थक निकम, रितेश सोनवणे, सतीश गायकवाड आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रा. विठ्ठल कांगणे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांची ऊर्जा ही तरुणांना लाजवेल अशी आहे. १९८५ साली आमदार थोरात राजकारणात आले. त्यानंतर सलग आठ वेळा विधानभवनात राहिले. राजकारण खऱ्या अर्थाने सुसंस्कृत करण्याचे काम त्यांनी केले. आमदार थोरात यांचा पराभव हा सर्वाना विचार करायला लावणारा आहे. नेता कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लोकनेते बाळासाहेब थोरात हे आहेत. काल विधानसभेत झालेला प्रकार हा अतिशय लाजिरवाणा असून आपलेच लोक आपल्याला खेचण्याचा प्रयत्न करतात हे यावरून सिद्ध होते.
बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याने कोणत्याही व्यासपीठावर जाता येते. याचे उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहे. स्वामी विवेकानंदांनी ही जागतिक शिकागो परिषदेत जगाला बंधू आणि भावाची शिकवण दिली. मात्र, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणी चुकीच्या रस्त्यावर जाताना दिसत आहे. आजच्या पिढीचे आदर्श वेगळेच निर्माण झाले आहे. आपले आदर्श हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे.
पालकांनी ही मुलांच्या संगतीवर लक्ष ठेवले पाहिजे. युवकांची संगत बिघडली की आयुष्य बिघडले. अनावधानाने मिळालेली प्रसिद्धी फार काळ टिकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. वेळीच आपले ध्येय निश्चित करा व त्या दिशेने मार्गक्रमण करा. अन्यथा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आपल्या पराभवाला आपणच कारणीभूत ठरू. कष्टाने व बुद्धीच्या जोरावर दिवस बदलता येतात. प्रत्येकाने आपले आदर्श कोण आहे हे पडताळून पाहिले पाहिजे.
धर्म, जात यांच्या नावावर तुम्हाला भडकवण्याचा व बिघडवण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. त्यांच्या जीवन मूल्यांचे अनुकरण करा. चाणक्य नीति व महाराजांची नीती आयुष्यात अपयशी होऊ देणार नाही. संगत चांगली ठेवा, कारण आपल्याला सशक्त देश घडवायचा आहे. विद्यार्थ्यानी आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवावे ते त्यांना वाईट मार्गाला जाऊ देणार नाही, असे देखील ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, आयुष्यात प्रत्येकाचेच गुरु वेगवेगळे असतात. त्यांच्याप्रती आदरभाव निर्माण करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा हा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित हा व्याख्यानमालेचा कार्यक्रम विद्यार्थ्याच्या जीवनाला दिशा देणारा ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे सर्वासाठीच मार्गदर्शक आहे. आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखान खानाची फजिती, अफजल खानाचा वध या सर्व गोष्टी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेने केल्या. महाराज हे पराक्रमी पुरुष होते. पुरोगामी विचार हा आपला विचार आहे. मात्र सध्या दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना चुकीचा प्रचार व प्रसार करून भरकवटण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा गोष्टींना बळी पडू नये असे आवाहन केले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, हा कार्यक्रम छत्रपती प्रतिष्ठानच्या मुलांनी आयोजित केला आहे. या व्याख्यानातून सर्वानाच ऊर्जा मिळेल. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांवर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने मोठा झाला. हल्ली खूप लोक जाती धर्माच्या नावावर तुम्हाला वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतील. मात्र तुम्ही तुमची जबाबदारी ओळखा व सावध रहा, असे त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन आहेर यांनी केले. यावेळी युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदर्श शिक्षक जे. के. सातपुते, आदर्श शिक्षक विनायक पाटील, अकॅडमी शिक्षक बाळासाहेब कांगणे, माजी सैनिक संदीप गुंजाळ, आदर्श डॉ. म्हणून डॉ. राज मस्के यांचा मान्यवरांच्या उपस्थित गौरव यावेळी करण्यात आला.