पुणे - नाशिक महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करा
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
संगमनेर LIVE | पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असल्याने या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात. अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवन येथे नुकतीच बैठक पार पडली. यावेळी आमदार खताळ यांनी ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
ज्या ठिकाणी महामार्गाचे काँक्रिटीकर सुरू आहे, त्याठिकाणी अपघात होऊ नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्गावर पोलीस तैनात करावेत. अशा सूचना दिल्या. या महामार्गाच्या कामामध्ये अडथळे येत असतील तर, ते आम्ही सोडवू. परंतु, नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. महामार्गावरील बंद असलेले पथदिवे तात्काळ कार्यरत करण्यात यावेत, महामार्गाच्या दोन्ही बाजूने तयार करण्यात आलेल्या सर्विस रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या सर्विस रस्त्यावरील खड्डे बुजवून सर्विस रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देशही देखील त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम, नाशिक विभागाचे अभियंता दिलीप शिंदे, संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, उप विभागीय वनाधिकारी अमर पवार, उप प्रादेशिक परिवहनअधिकारी अनंता जोशी, प्रभारी तहसीलदार आढारी, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी चंद्रकांत शिंदे यांच्यासह भूजल अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चंदनापुरीतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची द्यावी..
चंदनापुरी परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुणे - नाशिक महामार्गात गेलेल्या आहेत, त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. ते सर्व शेतकरी लवादात गेले आहेत. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश यापूर्वीच्या बैठकीत आपण आधिकाऱ्यांना दिले होते. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा आशा ही सूचना आमदार अमोल ख्रताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.