ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली!
◻️ सुप्रसिध्द जगुबाई मंदिराला पाण्याचा वेढा ; नदी काठची पिके पाण्याखाली
◻️ प्रवरा नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला
संगमनेर LIVE (आश्वी) | भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे ओझर बुद्रुक आणि ओझर खुर्द या दोन गावांना जोडणारा पूल मंगळवारी सकाळी पाण्याखाली गेला. तर, तालुक्यातील सुप्रसिध्द श्री जगदंबा माता (जगुबाई) मंदिराला देखील पाण्याचा वेढा पडला होता.
दोन दिवसापासुन भंडारदरा धरण लाभ क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने प्रवरा आणि म्हाळुगी नदी परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओझर बंधाऱ्यावरुन हजारो क्युसेसे पाणी नदीपात्रासह उजव्या आणि डाव्या कालव्यातून वाहत आहे. या पाण्यामुळे ओझर बुद्रुक व ओझर खुर्दला जोडणारा पुल पाण्याखाली गेला. जर, नदी काठची पिके पाण्याखाली गेली आहेत.
दरम्यान हा पुल पाण्याखाली गेल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे कनोली, कनकापुर, ओझर बुद्रुक या गावांचा ओझर खुर्द आणि पंचक्रोशीतील गावाशी संपर्क तुटला आहे. तसेच भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री जगदंबा माता मंदिराला देखील पुराच्या पाण्याने वेढा घातल्याचे दृश्य नजरेस पडले. त्यामुळे मंदिर परिसरासह ओझर बंधाऱ्यावरुन प्रवरा नदीपात्रात झेपावत असलेल्या पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. असे ज्येष्ठ पत्रकार योगेश रातडीया यांनी कळविले आहे.