मांचीहिल येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतनमध्ये ‘आषाढी एकादशी’ उत्सव
◻️ टाळ, मृदुंग, पखवाद, आणि अभंगाच्या गजरात दिंडीने वेधले लक्ष
संगमनेर LIVE (आश्वी) | शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतनमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यानी टाळ, पखवाद, हार्मोनियम वादन करून अभंग गायनाच्या गजरात दिंडीने नागरीकांचे लक्ष वेधले.
यावेळी इयत्ता आठवीचा विद्यार्थी ओम सूर्यवंशी याने सुंदर असे वारीचे महत्त्व सांगणारे प्रवचन केले. रोज आपल्या आई-वडिलांचे सकाळी दर्शन घेतल्याने तुम्हाला ईश्वराचे दर्शन होईल. भक्तांच्या भेटीसाठी आजही विठुराया विटेवर उभा आहे. शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना चांगला अभ्यास करा, म्हणजे यश निश्चितच तुमच्या हातात आहे. ईश्वर आपल्याला कशाप्रकारे भेटेल यासाठी अठरा प्रकारे आपण ईश्वराची भक्ती करता येते असे मत यावेळी त्यांनी मांडले.
विराज शेपाळ या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने ‘कानडा राजा पंढरीचा’ हे भक्तीगीत सादर करूनवातावरण मंगलमय केले. तर, इयत्ता नववीचाचं विद्यार्थी श्रेयस थोरात यांने ‘आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया’ या अभंगाचे गायन करून मातापित्यांची महती सांगितली. ओम सूर्यवंशी या विद्यार्थ्याने प्रवचना बरोबरच ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग स्वतः हार्मोनियम वाजवून गायला.
या विद्यार्थ्याना पखवाद साथ व मार्गदर्शन हभप सचिन महाराज गायकवाड यांनी केले. या विद्यार्थ्याना गायनासाठी शाळेतील विद्यार्थी जयवंत डोंगरे, तन्मय गोसावी व साई क्षीरसागर यांची साथ लाभली.
ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची हिल येथे सातत्याने अध्यात्म विषयक कीर्तने प्रवचनांचे आयोजन केले जाते. आज स्वतः विद्यार्थीच पखवाज वादन, हार्मोनियम वादन, गायन प्रवचन करण्याचा उत्तम प्रयत्न करत आहेत. संस्थेचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्माच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थी चांगला माणूस घडावा, त्याच्या अंगी अभ्यासाबरोबर शहाणपण यावं यासाठी अशा कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केलं जाते.
प्राचार्य विजय पिसे यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले. यावेळी शालेय परिसरातून भव्य दिंडी काढण्यात आली होती. शाळेतील विद्यार्थी विविध संतांची वेशभूषा करून आले होते. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पावली सादर केली. संस्थेतील रतन टाटा मैदानावर भव्य रिंगण सोहळा पार पडला. यावेळी महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक नाटिका सादर केली.
दरम्यान या कार्यक्रमासाठी संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली. यावेळी संचालिका नीलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे, सुनील आढाव, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, सचिन महाराज गायकवाड व संस्थेतील विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन प्रदीप जगताप यांनी केले.