श्री साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या
◻️ श्री साईबाबा संस्थानकडून युवराज बाबाविरोधात तक्रार दाखल
संगमनेर LIVE (शिर्डी) | जगप्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री साईबाबांची बदनामी करणाऱ्या तथाकथित बाबाविरोधात साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या संतापजनक प्रकाराची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी गाडीलकर यांच्या निदर्शनास आणून देताच विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडीलकर यांनी तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. संस्थानच्या इतिहासात अशाप्रकारे प्रथमच सर्वोच्च अधिकाऱ्याने श्रीसाईबाबांच्या बदनामीचा विषय गंभीरपणे घेत स्वतःच फिर्याद दाखल केली.
स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या युवराज उर्फ तलवार बाबा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या व्यक्तीने साईबाबा मुसलमान होते आणि ते मांसाहार करायचे, व्यभिचार करायचे, त्यांची मूर्ती मंदिरातून काढून नाल्यामध्ये टाकून द्या. अशा भक्तांच्या भावना दुखावणारे संतापजनक वक्तव्य केले होते.
असे धार्मिक तेढ निर्माण करणारे आवाहन असलेले व्हिडिओ बनवून समाजमाध्यमातून प्रसारित केले आहेत. या व्हिडिओमुळे सर्वधर्मियांतील अनेक साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या मुद्यांवर ही फिर्याद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
श्रीसाईबाबांची बदनामी करणाऱ्या या घटनेमुळे साईभक्तांमध्ये संतापाचे वातावरण असून, बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे अधिक तपास करत आहेत.
युवराज उर्फ तलवार बाबा याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जावी. अशी जोरदार मागणी भाविक करत आहेत. साईबाबा हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले जातात आणि त्यांची बदनामी करणाऱ्या अशा कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. असे साई संस्थानने स्पष्ट केले आहे. यामुळे धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सनदशीर मार्गाने योग्य तो धडा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान या घटनेनंतर या तथाकथित बाबा विरोधात शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.